📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ बाजारात राम नामाच्या शिक्क्यांचा बोलबाला
◆ भेटवस्तू म्हणून गोल्डन फोटोफ्रेमच्या राममंदिराची प्रतिकृती
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगामी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. कुठे प्रभू रामचंद्रांना नेसवण्यात येणारी वस्त्रे बनवली जात आहेत तर कुठे पूजेसाठीचे साहित्य बनवले जात आहे. मुंबईतील बाजारही राममय होत आहेत. राम मंदिराच्या लाकडाच्या प्रतिकृती नंतर आता या प्रतिकृतीच्या चांदीच्या आणि सोन्याच्या फ्रेमही बाजारात येत आहेत. भेटवस्तू म्हणून देण्यासाठी या प्रतिकृतींना प्रचंड मागणी आहे. बाजारात राम नामाच्या शिक्यांची सध्या बरीच चलती सुरू आहे. राम दरबार आणि राम मंदिराच्या प्रतिकृतीचे चांदीचे शिक्के लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, संपूर्ण देशभरातील वातावरण राममय बनत आहे. भेटवस्तू म्हणून देण्यासाठी प्रभू श्रीरामाची गोल्डन फ्रेमची विक्री खूप जोरात सुरू असून अडीच हजार रुपयांपासून ते बारा हजार रुपयांपर्यंत या फ्रेम विकल्या जात आहेत. यात प्रभू रामचंद्राच्या चरण पादुकांचाही समावेश आहे. याशिवाय राम मंदिराची प्रतिकृतीही बाजारात विक्रीसाठी येत आहे. याची किंमत वजनावर ठरेल, अशी माहिती मुंबईतील काही ज्वेलर्सनी दिली.
राम मंदिराच्या चांदीच्या
शिक्यांची मागणी वाढली
ठाण्यातील ज्वेलर्स असोसिएशनतर्फे मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसातच लग्नाचा सीजन सुरू होईल. साधारणतः लग्नाच्या वेळी गणेश-लक्ष्मीचे चांदीचे शिक्के वाटले जातात. यावेळी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामुळे राम मंदिराच्या चांदीच्या शिक्क्यांची मागणी वाढली आहे. विवाहात कमतरता भासू नये म्हणून 200 ते 250 चांदीच्या शिक्क्यांची आतापासूनच बुकिंग करून ठेवत आहेत.
लाकडी प्रतिकृती 250 ते 840 रुपये
एका रेडिमेड फर्निचर विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने जयपूर येथून लाकडावर कोरण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृती मागवल्या आहेत. गेल्या शुक्रवारी या प्रतिकृतींची पहिली खेपही त्याला मिळाली. यात वेगवेगळ्या आकाराच्या मंदिरांच्या 56 प्रतिकृती होत्या. अवघ्या एका दिवसात मंदिराच्या 28 प्रतिकृतींची विक्री झाली. या प्रतिकृतींमध्ये सर्वात लहान प्रतिकृती पाच इंचाची आहे तर सर्वात मोठी आठ इंचाची आहे. पाच इंचाच्या प्रतिकृतीची किंमत 250 रुपये तर, आठ इंचाची किंमत 840 रुपये आहे.
◆ व्यापारी महासंघाच्या मते राम मंदिर प्रतिकृतीची बाजारात प्रचंड मागणी असून मोठ्या प्रमाणात शॉर्टेज झाले आहे. ठाण्यातही लोकांनी या प्रतिकृतींना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत गणेश-लक्ष्मीचे चांदीचे शिक्के बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जायचे. त्या जागी राम मंदिराचे शिक्के हे मुंबईकरांची पहिली पसंती ठरू लागले आहेत. याची किंमत 950 रुपये आहे. बरेच जण घरात मंदिरात ठेवण्यासाठी 9 हजार ते 25 हजार रुपये किमतीचे राम दरबार मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.