📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ पावणे तीन लाखांच्या गुटख्यासह पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
◆ नंदुरबार, अलिबाग, रावेरमध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र पोलिसांनी नुकत्याच केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 2 लाख 78 रुपयांच्या गुटख्यासह 6 लाखांची कार असा एकूण 8 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या घटनांतील एकूण 4 गुटखा विक्रेत्यांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाया म्हणजेच ‘दै.मुंबई मित्र’च्या गुटखा विरोधी मोहिमेचा ‘इम्पॅक्ट’ समजला जातो.
पोलीस सूत्रानुसार, पहिल्या घटनेत नंदुरबारमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री आणि साठा करणार्या दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांकडून सुमारे 95 हजाराच्या मुद्देमाल जप्त करत या दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तळोदा शहरात करण्यात आली आहे.
तळोदा शहर व तालुका गुजरात हद्दीला लागून असल्याने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची सर्रास खरेदी विक्री होत असते. अनेकदा कारवाई होऊन देखील सर्रासपणे वाहतूक व विक्री सुरूच असते. गुजरात राज्यातील तळोद्यापासून जवळ असलेल्या गावांमध्ये साठा करून खरेदी विक्री करण्यासाठी मुद्देमाल शहर व तालुक्यात आणला जात असतो. अशाच प्रकारे तळोदा शहरातील दोन दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नगरपालिकेसमोरील दुर्गा किराणा दुकानावरून पोलिसांनी विविध प्रकारचे तंबाखू व गुटख्याचे पाऊच जप्त केले आहेत. याची एकूण किंमत 43 हजार 920 रुपये आहे. तर दुसर्या कारवाईत एका पीठ गिरणी मालकाकडून 50 हजार 98 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही दुकानदारांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार करीत आहेत.
दुसर्या घटनेत अलिबागमधील मांडवा परिसरातील नवखार येथे बेकायदा पानमसाला गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे छापा टाकला असता 80 हजार 960 रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला नवखार येथे विमल पानमसाला अवैधरित्या विकला जात असल्याची माहिती मंगळवारी रात्री गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार सपोनी भास्कर जाधव, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, पो.कॉ. ईश्वर लांबाटे यांच्या कारवाई पथकाने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली.
नवखार येथील आरोपी सागर बाळाराम पाटील याच्या ताब्यातून 80 हजार 960 रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व 6 लाख रुपये किमतीची पांढर्या रंगाची कार असा एकूण सहा लाख 80 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला. आरोपी सागर बाळाराम पाटील याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या तक्रारीवरून मांडवा सागरी पोलीस भादंवि कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाणे करीत आहे.
तिसर्या घटनेत राज्यात बंदी असलेला सुमारे एक लाख रुपयांचा विमल गुटखा रावेर रमेश रूपचंद पाटील रेसच्या बसस्थानक परिसरातून जप्त करण्यात आला. पोलिसांनी पारोळा येथून जप्त केले. मंगळवारी सकाळी 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास रावेर येथील बसस्थानक परिसरातील एका झाडाखाली गस्तीवर असलेले पोलीस आले असता, इसम पांढरी रेक्सिन पिशवी घेऊन बसला होता. ही कारवाई संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपास केला असता पारोळा येथे विक्रीसाठी असलेला 3,500 रुपये किमतीचा गुटखा सापडला. हा गुटखा बुरहानपूरच्या आशिष एंटरप्रायजेसचा मालक प्रितेश शेट याचा असल्याचेही त्याने कबूल केले. तो त्याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने कबूल केले. यानंतर सुमारे 1 लाख 3 हजार 500 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे करत आहेत.