📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ मुंबई पोलिसांचे यशस्वी ‘ऑपरेशन मुस्कान’!
—–
बेपत्ता मुलांचा रोज आढावा
मुंबई पोलीसांनी बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत दररोज आढावा घेतला जातो. त्यापैकी प्रकरणाचे गांर्भिय ओळखून पुढील कारवाई केली जाते. मुलांना शोधण्यासाठी गुन्हे शाखेबरोबरच स्थानिक पोलीसही त्यापध्दतीने कार्यवाही करीत असतात.
-राजतिलक रोशन
पोलीस उपायुक्त, गुन्हे, मुंबई
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविली असून या मोहिमेला मोठ्याप्रमाणात यश मिळताना दिसत आहे. सध्या मुंबई पोलीस दलात गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी राजतिलक रोशन हे जेव्हा वसई-विरारमध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक (ग्रामीण) म्हणून कार्यरत होते, तेव्हा त्यांनी अल्पवयीन बेपत्ता मुलांच्या प्रकरणांपैकी जवळपास 89 टक्के प्रकरणांचा छडा लावला होता आणि 450 मुलांची यशस्वी सुटका केली होती. त्यांनी बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी विशेष यंत्रणा आणि मोडस ऑपरेंडी वापरली होती. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यास केला होता.
अवघ्या आठवडाभरातील दोन वेगवेगळ्या घटनांपैकी एका प्रकरणात बेपत्ता अल्पवयीन मुलीला अवघ्या 4 तासात तर दुसऱ्या प्रकरणात एका मनोरुग्ण मुलाला 36 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शोधून त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरला.
पहिल्या घटनेत अंधेरी पूर्व परिसरातील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदिवली येथे राहणारी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पवई पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. हे प्रकरण गांभिऱ्याने घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड आणि गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांची एक टीम बनवली.
या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात मुलगी एका रिक्षामध्ये बसताना दिसली. यावरून पोलिसांनी रिक्षा चालकाची ओळख पटवून त्याच्याशी संपर्क साधला. रिक्षावाल्याने मुलीला कांदिवली परिसरात सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी ज्या ठिकाणी रिक्षावाल्याने मुलीला सोडले होते, त्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. कांदिवलीच्या त्या परिसरात चार तास अथक परिश्रम शोध घेतल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलीला यशस्वीरित्या शोधून काढले आणि तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. सदर मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत असून घरातील कामाबद्दल वडील तिच्यावर ओरडल्यामुळे तिने रागाच्या भरात घर सोडले होते.
दुसऱ्या घटनेत मालाड पूर्व येथील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चाळीत राहणारा दहा वर्षाचा अल्पवयीन मुलगा 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला. हा मुलगा मनोरुग्ण असल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. या मुलाचे वडील हे माथाडी मजूर आहेत. त्याचप्रमाणे घरी त्याची आई आणि एक मोठा शाळेत जाणारा भाऊ आहे. हा मनोरुग्ण मुलगा बेपत्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शेजारीपाजारी, परिसरात, बराच शोध घेतला. मात्र तो मुलगा सापडला नाही. बराच वेळ शोध घेतल्यावर बेपत्ता मनोरुग्ण मुलाच्या हवालदिल कुटुंबियांनी अखेर दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली, आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
अशा प्रकारच्या मनोरुग्ण मुलांच्या संभाव्य अपहरणाची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन दिंडोशी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा परिमंडळ बाराच्या अधिकाऱ्यांनीही समांतर तपास सुरू केला. या अधिकाऱ्यांनी बेपत्ता
मुलाला शोधण्यासाठी शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले बऱ्याच मेहनतीनंतर बेपत्ता मुलगा चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांची सीसीटीव्ही फुटेज तपासले. बरेच फुटेज बारकाईने वारंवार पाहिल्यानंतर हा मुलगा मुंबई सेंट्रल या स्थानकावर उतरताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील परिसरात कसून शोध घेतला.
अथक परिश्रमानंतर 3 जानेवारी 2024 रोजी दुपारी हा बेपत्ता मुलगा एका फुटपाथवर झोपलेला आढळला. गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी या मनोरुग्ण मुलाला सुखरूप परत आणले आणि त्याला दिंडोशी पोलीस ठाण्यात त्याच्या पालकांच्या हवाली केले. त्यावेळी त्या गरीब कुटुंबाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आणि मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वीरित्या पार पडले.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, पोलीस उपनिरीक्षक निलोफर शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिरसाठ यांच्या निदर्शनात हा शोध यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.