बदलापूर : बदलापूर येथील बेलिवली परिसरात राहणारे तीन मित्र रस्त्याच्या कडेने ‘मॉर्निंग वॉक’ करत असताना त्यांच्या पाठीमागून येणार्या दुधाच्या एका भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत अनुराग चव्हाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. बदलापूर येथील प्रेमचंद भालेवार, जयेश विशे आणि अनुराग चव्हाण हे तिघे मित्र शनिवारी सकाळी बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरातील पेट्रोलपंपापासून शिवमंदिर टी-पॉइंट सर्कलदरम्यान चालत होते. यावेळी शिवमंदिर सर्कलकडे जाणारा रस्ता ओलांडत असताना पाटील पेट्रोलपंपाच्या दिशेने आलेल्या एका भरधाव टेम्पोने अनुरागला धडक दिली.