📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ ठाणे पोलिसांची दमदार कामगिरी
◆ ठाण्यात 36 लाखांचा तर पालघरमध्ये 2 लाखांचा गुटखा जप्त
◆ नवा गुटखा तस्कर विनोद गंगवाणी
◆ कल्याणमध्ये 30 लाखांचा गुटखा जप्त
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ठाण्यातील गुन्हेगारांना सळो की पळो करून टाकले आहे. त्यामुळे ठाण्यातील गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांवर ठाणे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. पोलीस आयुक्त डुंबरे यांच्या कठोर आदेशामुळे ठाणे पोलिसांनी आता गुटखा तस्करांभोवतीही आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. ठाणे शहर पोलिसांनी गेल्या 4-5 दिवसात केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 38 लाखांचा गुटखा जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे केलेल्या मोठ्या कामगिरीत पोलिसांनी 30 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असली तरी मुख्य आरोपी विनोद गंगवाणी हा अद्याप फरार आहे. विनोद गंगवाणी हे नवे नाव गुटखा तस्करीमध्ये उदयाला येत असून लवकरच त्याचा इतिहास “दै.मुंबई मित्र“ प्रसिद्ध करणार आहे. दरम्यान पालघर पोलिसांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाखांचा गुटखा जप्त करत दोघांना अटक केली आहे.
गुजरात, वापी येथून चोरट्या मार्गाने आणलेला 30 लाख रुपयांचा प्रतिबंंधित गुटख्याचा साठा कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील गुटखा घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी विनोद गंगवाणी याचा पोलीस शोध घेत आहेत. मोहम्मद राजा मोनीस पठाण (26) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील वापी भागात डोंगरी फरीया येथे स्पीन पार्क इमारतीत राहतो. खडकपाडा पोलिसांनी मोहम्मद, फरार आरोपी विनोद गंगवाणी याच्या विरुद्ध मानवी जीवनास हानीकारक होईल अशा प्रतिबंधित गुटख्याची विक्री, अन्न आणि औषध प्रशासन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीससूत्रांनुसार, गुरुवारी दुपारी खडकपाडा पोलीस कल्याणमधील दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुर्गाडी किल्ला येथून एक ट्रकचालक भरधाव वेगात संशयास्पदरित्या ट्रक चालवित असल्याचे आढळले. पोलिसांनी पाठलाग करून मोहम्मद याचा ट्रक रोखून धरला. यावेळी 10 गोण्यांमध्ये विमल पान मसाला, एक पाकिटाची किंमत 198 रुपये. विमल पान मसाल्याचा एकूण 14 लाखांचा साठा आढळला. तंंबाखू जर्दाच्या दीड लाख किमतीच्या 30 गोणी, लहान विमल दर्जा गुटखा एकूण 500 पाकिटे असा एकूण ट्रकसह 30 लाखांचा गुटख्याचा साठा खडकपाडा पोलिसांंनी जप्त केला. हा गुटखा उल्हासनगर परिसरात नेऊन तेथून त्याची घाऊक पद्धतीने विक्री करण्याचा तस्करांचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. फरार आरोपी विनोद गंंगवाणी याच्या अटकेनंतर खरी माहिती उघड होईल असे पोलिसांंनी सांगितले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
—–
पालघरमध्ये 2 लाखांचा गुटखा जप्त
पालघर पोलिसांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या राज्यात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सुनील जगाराम गोधरा आणि सुरेश भुराराम चौधरी या संशयितांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी रात्री गस्तीदरम्यान पकडण्यात आले. 2.17 लाख रुपये किमतीच्या बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांनी भरलेल्या कारमधून दोघे प्रवास करत होते.
—–
शांतीनगर पोलिसांकडून 8 लाखांचा गुटखा जप्त
ठाणे पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी बुधवारी एका पान स्टॉलवर छापा टाकला यावेळी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि विक्री करत असल्याचे आढळले. फरमान अहमद मंजूर अन्सारी आणि आणखी तीन जणांविरोधार गुन्हा दाखल करण्यात आला.