📰 *MUMBAI MITRA IMPACT*
——
◆ *गुन्हे शाखेकडून एक कोटींचा गुटखा जप्*
★ कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ अंतर्गत तीन जणांवर गुन्हा दाखल
—-
विशेष प्रतिनिधी
मुंबई: विक्रोळीत विक्रीसाठी आणलेला तब्बल एक कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला यश आले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणात इब्राहिम मैनुद्दीन इनामदार (३०), संतोषकुमार रामसिंहासन सिंग (२५) आणि कलीम वाहिद हसन खान (३०) या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत.
‘दै. मुंबई मित्र’ने ५ महिन्यांपासून गुटख्याविरोधात ‘ऑपरेशन गुटखा’ही मोहीम उघडली असून, या मोहिमेअंतर्गत गुटखा तस्करांची माहिती,तस्करीचा मार्ग, उत्पादन आदींविषयी इत्यंभूत माहिती ‘दै. मुंबई मित्र’ने वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे. केवळ माहिती प्रसारित करून गप्प न बसता, ‘दै. मुंबई मित्र-वृत्त मित्र’ समूहाचे संपादक अभिजीत राणे यांनी व्यक्तीकरित्या उच्च पातळीवरील पोलीस अधिकारी आणि गृह खात्यातील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडे गुटख्याविरोधात तक्रारी केल्या.त्याचप्रमाणे वेळोवेळी गुटख्याविषयी लेखी तक्रारीही ‘दै. मुंबई मित्र’तर्फे केल्या जात आहेत. या मोहिमेची महाराष्ट्र पोलिसांनी गंभीर दखल घेत गुटख्याविरोधात तीव्र कारवाया करायला सुरुवात केली. आणि कोट्यवधी रुपयांचा गुटखा आतापर्यंत जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेला दिवसेंदिवस यश प्राप्त होत असून विक्रोळीची कारवाई हा सुद्धा ‘दै. मुंबई मित्र’चाच इम्पेक्ट आहे.
पोलीस सुत्रानुसार, राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती कक्ष नऊचे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना मिळताच, त्यांच्या नेतृत्वात कक्ष नऊच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. डी. एन. नगर परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक करत असलेला एक ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने ७८ लाख एक हजार २०० रुपये किंमतीचा गुटखा आणि २६ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला.
कक्ष नऊने याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र.२७/२०२४) नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात भादवी.कलम १८८,२७२,२७३,३२८,३४,यासह अन्न व सुरक्षा आणि मानके अधिनियम ५९ या कलमांचा समावेश आहे.
याप्रकरणी आरोपी इब्राहिम,मैनुद्दीन इनामदार (३० ) याला अटक केली. पुढील तपासासाठी हा गुन्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. इनामदारच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कांदिवली येथे पार्क केलेला गुटख्याने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने संतोषकुमार रामसिहासन सिंग(२५ ) आणि कलीम वाहिद हसन खान (३० ) यांना अटक करुन २८ लाख १७ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटखा आणि ताब्यात घेतलेला सात लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त केला.
गुन्ह्यातील त्रिकूटाकडून एकूण एक कोटी सहा लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली ३३ लाख रुपये किंमतीची दोन वाहने असा एकूण १ कोटी ३९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेंन भरती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे ) लखमी गौतम , अपर पोलीस आयुक्त (गुन्हे ) शशी कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्र- १ ) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त डी (पश्चिम ) महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पो.नि. सचिन पुराणिक,स.पो.नि.उत्कर्ष वझे, स.पो.नि.महेंद्र पाटील, पो.ह.संजय भोसले, पो.ह.दत्तात्रय कोळी, पो.ह.राहुल पवार, पो.शि. प्रशांत भुमकर, पो.शि. अमोल सोनवणे पो.शि. शार्दूल बनसोडे , पो.ह.चा. अविनाश झोडगे यांनी पार पाडली.