ठाणे
मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणुक करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्हयात असंख्य गुंतवणुकदार यांनी गुंतवणुक केली असल्याचे तपासात आढळुन येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत आणि फसवणुक झालेल्या रकमेत खुप मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अजय कृपाशंकर श्रीबस्तक, सलिम चांद सय्यद, मोहमद रजा याकुब खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांना न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांचा साथीदार इशाक जुम्मन अन्सारी हा फरार असून पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. या चौघांनी फ्लिप ड्रीम इंडिया एलएलपी फ्लिप ड्रीम इंडिया एक्वा एलएलपी या नावाच्या कंपनीच्या स्थापना केली. या कंपनीद्वारे ते मत्सपालनाचा व्यवसाय करतात असे गुंतवणूकदारांना सांगायचे.
तसेच मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे अमिष ते गुंतवणूकदारांना दाखवत होते. अशा प्रकारे त्यांनी १३ गुंतवणुकदारांचे एकुण १ कोटी ७ लाख १५ हजार रुपये ठेवी स्वरूपात स्विकारून त्यांना परतावा आणि मूळ रक्कम दिली नाही. याप्रकरणी एका गुंतवणूकदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.