प रेल्वेप्रशासनाचा सेंट्रल रेल्वेच्या उपनगरातील प्रवाशांसाठी महत्वपूर्ण निर्णय
प रेल्वे प्रशासनाकडून कोट्यवधींचा खर्च
प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावरील अतिगर्दीचे, तसेच महत्त्वाचे असलेले मुलुंड, भांडुप स्थानकांचा कायापालट होणार आहे. या दोन्ही स्थानकांवर अत्याधुनिक अशा पंचतारांकित सेवासुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट एमयूटीपी फेज-3 ए प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. विशेष म्हणजे मुलुंड, भांडुप ही रेल्वेस्थानके फाईव्ह स्टार श्रेणीत गणली जाणार आहेत. या स्थानकांचे पंचतारांकित सौंदर्यीकरण पुढील 36 महिन्यांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशस्त पूल, प्रवाशांना वावरता यावे यासाठी ऐसपैस जागा (डेक), स्थानक प्रवेशद्वाराचे अद्ययावत सौंदर्यीकरण, रेल्वेची अद्ययावत शासकीय कार्यालये, रिझर्व्हेशन दालन, तिकीट घर, महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृह, व्हिजिटिंग रूम, पार्किंग झोन, हिरव्या जागांची तरतूद, तसेच रेल्वेस्थानकाची शोभा वाढवणारी सजावट साकारण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेले पूल, स्कायवॉक, लिफ्ट, स्वयंचलित जिने यांना बाधा येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनुसार असे समजते की मुलुंड आणि भांडुप रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा मंजूर झाल्या आहेत. ईशान्य मुंबईकरांच्या दृष्टीने सरकारने घेतलेले निर्णय खूपच दिलासादायक आहेत. आनंददायी रेल्वे प्रवास अनुभवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.’