नवी मुंबई
मध्यंतरी कांद्याचे वाढलेले दर पाहता काही आयातदारांनी इराणमधून कांद्याची आयात केली होती. हे कांदे आत्ता व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये दाखल झाले असून त्यांच्या छाननीचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा कांदा आला असल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळेल, मात्र आपल्या देशी कांद्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
कांद्याचे दर वाढलेले असताना हा परदेशी कांदा मागवण्यात आला होता, मात्र हा कांदा आपल्याकडे पोहोचेपर्यंत कांद्याचे दर उतरून २० ते २५ रु. किलोवर आले आहेत. त्यामुळे नफा कमावण्याच्या उद्देशाने मागवलेला हा कांदा बाजारात पडून राहण्याची शक्यता आहे. त्याला हवा तसा उठाव मिळेल की नाही, याबाबत व्यापाऱ्यांना शंका आहे. हा परदेशी कांदा चवीला गोडूस असल्याने घरगुती वापरासाठी त्याची खरेदी केली जात नाही. केवळ हॉटेलमध्ये वापरण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. आता देशी कांद्याचे दर आवाक्यात आले असल्याने परदेशी कांद्याचे दर पडण्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.