नाशिक
कोरोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आता नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
चीनहून भारतात परतलेले तीन रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. अशात आता दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी सोमवारीच आली होती. देशात कोरोनाचे एकूण सात संशयित रुग्ण आहेत. आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर त्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होईल. यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नाशिकच्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह
नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या करोनासदृश्य रुग्णाचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला असताना इराणवरुन आलेला 35 वर्षीय तरुणाने सर्दी व ताप आल्याची तक्रार केल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने रुग्णालयाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले असता काल मंगळवारी त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला.
दिल्लीत परिक्षा पुढे ढकलल्या
भारतात देखील कोरोनाचे 5 रुग्ण अढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी भारतात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याची घोषणा केली. त्यानंतर आता नोएडामध्ये कोरोना व्हायरस संबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान एका शाळेने विद्यार्थांच्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार शाळेतील एका विद्यार्थांच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे शाळेने तात्काळ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तेलंगणामध्ये देखील एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील करोना पीडित व्यक्तीने एक पार्टी ठेवली होती. काही शाळकरी मुलंही या पार्टीत सहभागी झाले. या पीडित व्यक्तीपासून करोना व्हायरस पसरला असल्याचं लक्षात आल्यानंतर ही शाळाही बंद करण्यात आली आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून इतर शाळाही बंद ठेवल्या जात आहेत. पार्टीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला वेगवेगळं राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पार्टीतील लोकांचीही चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून आलेला नाही.
चार देशांचे व्हिजा निलंबित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी एक सूचना जारी केली आहे. यानुसार, ईराण, इटली, दक्षिण कोरिया, जपानच्या नागरिकांचा व्हिजा किंवा ई व्हिजा निलंबित करण्यात आला आहे. या परदेशी नागरिकांनी अजूनपर्यंत भारतात प्रवेश केलेला नाही. तसंच जपान आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांना दिली जाणारी ङ्गव्हिजा ऑन अरायव्हलफची सुविधाही रद्द करण्यात आली आहे. ज्यांना भारतात प्रवेश करणं अत्यावश्यक आहे अशा लोकांनी आपल्या जवळच्या भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मास्कची किंमत वाढली
मुंबईतही करोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्जिकल मास्कच्या खरेदीत अचानक वाढ झाली आहे. या मास्कच्या किंमती 2400 टक्क्याने वाढल्या असून मुंबईत एक रुपयांला मिळणारा मास्क 25 रुपयाने विकला जात आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालयात सर्जिकल मास्कची कमतरता निर्माण झाली आहे.
मुंबईतील अनेक रुग्णालयात सर्जिकल मास्क होलसेलमध्ये विकत घेतले जातात. एका बॉक्समध्ये 100 मास्क असतात. हे एन 95 मास्क करोना व्हायरसपासून बचावासाठी वापरले जातात. मात्र, त्यांचाच स्टॉक संपत आला आहे. आम्ही ऑपरेशन रद्द करू शकत नाही. त्यामुळे महागडे मास्क खरेदी करण्याशिवाय खासगी रुग्णालयांना गत्यंतर नाही, असे जसलोक रुग्णालयाचे सीईओ डॉ. जितेंद्र हरयन यांनी सांगितले. करोना अद्याप मुंबईत पोहोचलेला नाही. जर करोना व्हायरसने मुंबईत शिरकाव केला तर काय होईल? असा सवाल हरयन यांनी केला. राज्य सरकारने मास्कच्या किंमतींवर नियंत्रण आणण्याची मागणीही त्यांनी केली. माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालय आणि वांद्रे येथील लिलावती रुग्णालयातही मास्कची कमतरता निर्माण झाली आहे. मास्कच नव्हे तर सर्जिकल गाउन आणि प्लास्टिकच्या शीट्सचीही कमतरता भासत असल्याचं रहेजाचे सीईओ डॉ. हिरेन अंबगावकर यांनी सांगितले.
हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा
मुंबईत हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायजरला पसंती मिळत असल्यानेच मुंबईतील शहर तसेच उपनगरातील दुकानांमध्ये हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध होत नसल्याचे आढळले आहे. येत्या 10 ते 15 दिवसांपर्यंत हा शॉर्टेज असेल असे महाराष्ट्र केमिस्ट एण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक दुकांनांमध्ये ब्रॅण्डेड अशा कंपन्यांचे हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध होणार नाहीत असेही ते म्हणाले. करोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांमध्ये चिंतेचेवातावरण आहे. त्यामुळे शाळकरी मुलांपासून ते मोठ्या वयोगटातील सर्वच हे हॅण्ड सॅनिटायजरचा सर्रास वापर करत आहेत.