📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● ठाण्यामध्ये मेट्रोला ३ ठिकाणी भेगा, दहशतीच्या सावटाखाली मेट्रो-४
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुलुंडमध्ये कठड्याचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही मेट्रो लाईन-४ वरील संकटे कमी होण्याऐवजी वाढताना दिसत असून नागरिकांची धाकधूक अधिकच वाढली आहे. या मेट्रोलाईनच्या ठाण्यातील माजीवडा, कासारवडवली आणि आजूबाजूच्या परिसरातील मेट्रोचे खांब व जोडण्यांमध्ये कथितरित्या भेगा पडल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकल्याने बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो लाईन-४ च्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले असून नागरिक एमएमआरडीएच्या कार्यप्रणालीवर संतप्त झाले आहेत.
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलुंडमध्ये मेट्रोच्या कठड्याच्या भिंतीचा (पॅरापेट वॉल) भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. या घटनेमुळे खळबळ उडून एमएमआरडीएच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उभे राहू लागले. या प्रकरणाचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच मेट्रो लाईन-४ च्या वेगवेगळ्या भागांमधील भेगा आणि संरचनात्मक त्रुटींबाबत सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित होऊ लागल्याने पुन्हा एमएमआरडीएवर टीकेची झोड उठू लागली आहे. नेटिझन सचिन शिंगारे यांनी आपल्या ‘ एक्स ‘ अकाउंटवर मेट्रो लाईन-४ ची अनेक छायाचित्रे तसेच व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या आहेत. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठाण्यातील विजय गार्डन मेट्रो स्थानकाजवळ, कॉसमॉस ज्वेलर्स आणि कासारवडवली पोलीस ठाण्याजवळ मेट्रोच्या जोडण्यांमध्ये (ज्वाईट्स) भेगांसदृश्य रेषा दिसत आहेत. शिंगारे यांच्या मते जर ही जोडणी साधी बांधकाम जोडणी असेल तर तसे स्पष्ट करण्यात यावे. मात्र जर या भेगा वास्तवात असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात. अशी मागणी शिंगारे यांनी केली आहे.
मेट्रो लाईन-४ वरील कापूरबावडीच्या समोरील सिनेवंडर मॉल परिसर, कासारवडवलीच्या पूर्ण भागांचे तात्काळ निरीक्षण करून संभाव्य दोष दूर करण्यात यावेत. जेणेकरून भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
—–
जास्त खर्च, ढिसाळ बांधकाम
मेट्रो लाईन-४ च्या बांधकामाचे कंत्राट सुमारे ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र तरीही या लाईनच्या बांधकामाची गुणवत्ता कमी दर्जाची असल्याने सोशल मीडियावर टीकेचा विषय बनला आहे. या लाईनच्या बांधकामाबाबत तक्रारी आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिप्समुळे प्रकल्पाची देखरेख, बांधकाम गुणवत्ता आणि सुरक्षेच्या उपायोजनांवर पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘ या संभाव्य त्रुटी वेळेतच दूर केल्या जाणार की, आणखी एखाद्या नवीन दुर्घटनेची एमएमआरडीए वाट पाहणार? ‘ असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकल्पाची त्रयस्थ समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणीही केली जात आहे. कारण प्रकल्पाचा सध्याचा सुरक्षा स्तर कोणत्याही मानकांनुसार स्वीकार्य नाही.
काहींच्या मते गायमुख-माजीवाडा आणि मुलुंड एलबीएस मार्ग हे खूपच धोकादायक वाटत आहेत. या प्रकल्पाचे खराब व्यवस्थापन, किनाऱ्यांवर साचलेला मलबा आणि कासारवडवली-ओवळा मेट्रो स्थानकांच्या अर्धवट कामांबद्दल जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पाच्या मंद गतीने चालणाऱ्या कामांवर काही जण नाराज आहेत. काहींनी या प्रकल्पाच्या अभियंता गुणवत्ता आणि एमएमआरडीएच्या तपासणी प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे करताना बऱ्याचदा खराब गुणवत्तेची माहिती दुर्घटना घडल्यानंतरच कळत असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून अर्थात कराच्या पैशातून अवाढव्य खर्च करूनही कामाबाबत उत्तरदायित्व दिसत नाही. … दिसतो तो केवळ निष्काळजीपणा! …अशी टीकाही जनतेमधून केली जात आहे.








