*📰 MUMBAI MITRA EXPOSE*
——-
● पालिकेच्या दस्तक वस्ती योजनेत घोटाळा
● *एम/पूर्व प्रभागात 50% सफाई कर्मचारी बेपत्ता*
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणारी स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना (दस्तक वस्ती) सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालिकेच्या एम/पूर्व विभागामध्ये दस्तक वस्ती योजनेंतर्गत पालिकेद्वारे 100 टक्के कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जात असतानाही केवळ 50 टक्के कर्मचारीच काम करत आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमध्ये स्वच्छतेचा आढावा घेतला असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, झोपड्यांमध्ये स्वच्छता करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना अर्थात दस्तक वस्ती योजना मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत एखादी झोपडपट्टी अथवा परिसर लोकसंख्येच्या प्रमाणात विविध स्वयंसेवी संस्थांना दिले जातात. या संस्था झोपडपट्ट्यांमधील कचरा घरोघरी जाऊन गोळा करतात आणि एखाद्या मुख्य नाक्यावर गोळा करून ठेवतात. तेथून पालिकेच्या कचरा गाडीत तो कचरा भरला जातो आणि डम्पिंग ग्राउंडवर नेला जातो. मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतेसाठी दस्तक वस्ती योजना राबवली जाते. साधारणतः 1200 घरांची स्वच्छता एका स्वयंसेवी संस्थेकडे दिली जाते. या संस्थेद्वारे एक मुकादम आणि 7 ते 8 कर्मचारी नेमले जातात. प्रत्येक कचरा वेचक कर्मचाऱ्याला प्रतिमाह सहा हजार रुपये मानधन दिले जाते.
पालिकेच्या एम/पूर्व प्रभागात सुमारे 90 स्वयंसेवी संस्थांना दस्तक वस्ती योजनेचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटानुसार, सुमारे 900 सफाई कर्मचारी कार्यरत असणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 50 नगरसेवकांनी घेतलेल्या आपापल्या वॉर्डमध्ये साफसफाईच्या आढाव्यामध्ये हा घोटाळा उघडकीस आला.
पालिकेच्या एम/पूर्व प्रभागामध्ये शिवाजीनगर, बैंगनवाडी, कमला रमण नगर, रफी नगर, नटवर पारिख कंपाऊंड, निरंकारी, गजानन कॉलनी, लोटस कॉलनी, दुर्गा सेवा संघ अशा अनेक मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. येथील गल्ल्या आणि नाल्यांची साफसफाई स्वयंसेवी संस्थांद्वारे केले जाते. स्थानिकांच्या आरोपानुसार येथे रोज साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साठलेला आहे. मात्र प्रत्येक महिन्याला ठेकेदार संस्थांकडून प्रत्येक घरामागे 20 रुपये लोक वर्गणी आणि पालिकेकडून मानधन वसूल केले जाते. या गंभीर निष्काळजीपणाची घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सहाय्यक मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
——
*दस्तक वस्ती योजनेतील घोटाळा*
● वॉर्ड क्र. 136 मध्ये 6 दस्तक वस्ती योजना आहेत. नियमानुसार 60 पेक्षा जास्त सफाई कर्मचारी कार्यरत असणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदार संस्थांकडून केवळ 20 ते 20 कर्मचाऱ्यांद्वारे साफसफाई करून घेतली जाते. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचारी रोज गैरहजर असतात.
● वॉर्ड क्र.139 मध्ये 5 संस्थांवर दस्तक वस्ती योजनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येथे 60 सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ 30 पेक्षाही कमी कर्मचारी साफसफाई करताना आढळले.
● वॉर्ड नं. 137 मध्येही जवळपास हीच स्थिती आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याने येथे जागोजाग घाणीचे साम्राज्य उभे राहिले आहे. याप्रकरणी पालिकेच्या सभागृहात आवाज उठवून चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.








