*📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE*
——-
● उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका| सर्जनला शिक्षा; पॅरिस न्यायालयाची कारवाई
● *लिंगवाढ उपचारादरम्यान ओमेगा डायमंड्सचे मालक हिरे व्यापारी एहुद आर्ये लानियाडो यांचा मृत्यू*
—–
वृत्तसंस्था, पॅरीस
लिंग मोठे दिसावे यासाठी करण्यात येणाऱ्या उपचारादरम्यान एका अब्जाधीशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली आहे. या प्रकरणात संबंधित सर्जनला तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली असून, आयुष्यभरासाठी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बेल्जियन-इस्रायली हिरे व्यापारी आणि ओमेगा डायमंड्सचे मालक एहुद आर्ये लानियाडो (वय 65) यांचा पॅरिसमधील सेंट-ऑनॉरे-पाँथ्यू सौंदर्य शस्त्रक्रिया क्लिनिकमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एहुद लानियाडो हे लिंग मोठे दिसावे यासाठी नियमितपणे इंजेक्शनद्वारे उपचार घेत होते. हे उपचार प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन ‘गाय एच’ करत होते, जे श्रीमंत ग्राहकांवर उपचार करण्यासाठी ओळखले जात होते. हे उपचार अनेकदा कार्यालयीन वेळेनंतर केले जात असल्याचेही समोर आले आहे. मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला सदोष मनुष्यवधाचा संशय होता, मात्र पुढील तपासात सर्जनने रुग्ण धोक्यात असतानाही वेळेवर मदत न केल्याचे, बेकायदेशीर औषधांचा वापर आणि वैद्यकीय परवाना नसताना उपचार केल्याचे आरोप सिद्ध झाले.
तपासात असेही समोर आले की, रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर सर्जनने रात्री 8 वाजता पहिला फोन केला, मात्र अग्निशमन दलाला तब्बल दोन तासांनंतर माहिती देण्यात आली. या विलंबामुळे रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचल्याचे न्यायालयाने मान्य केले.
या प्रकरणात पॅरिस न्यायालयाने सर्जन गाय एच यांना 15 महिन्यांची शिक्षा सुनावली असून, त्यांच्या अनुपस्थितीत उपचार करणाऱ्या दुसऱ्या सर्जनला 12 महिन्यांची निलंबित शिक्षा देण्यात आली आहे. दोघांनाही आयुष्यभरासाठी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांच्यावर आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. या घटनेमुळे सौंदर्य उपचारांच्या सुरक्षिततेवर आणि बेकायदेशीर वैद्यकीय उपचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.








