*📰 MUMBAI MITRA EXPOSE*
——-
● *मुंबई महापालिकेत महापौर बसण्यापूर्वीच ‘हात सफाई’*
● गेल्या १५ दिवसात पालिकेकडून तब्बल २९० निविदा जारी
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 11 फेब्रुवारीला होणार असल्याचे कळते. निकालानंतर आचारसंहिता संपल्यामुळे पालिका प्रशासनाने धिसाडघाई करत गेल्या पंधरवड्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 290 विविध कामांसाठीच्या निविदा जारी केल्या आहेत. पूल, पदपथ, रस्ते, उद्याने, पथदिव्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या निविदा कोट्यावधी रुपयांच्या आहेत. प्रत्येक कामांच्या बदल्यात नेहमी चालढकल करणाऱ्या पालिकेने आचारसंहिता काळात या निविदा तयार करून ठेवल्या होत्या. महापौर बसण्यास काही दिवस शिल्लक असताना एवढ्या घाईगडबडीने निविदा का काढल्या गेल्या आहेत? 15 दिवसांत 290 निविदा जारी करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांना काय दाखवून द्यायचे आहे? महापौर बसल्यास काय बिघडणार होते? काही व्यव्हार या पुर्वीच ठरले होते का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे निविदा काढण्यासाठी पालिकेने केलेल्या अतिघाईमुळे हा पालिकेचा मोठा घोटाळा असल्याचा संशय मुंबईकरांकडून व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे 15 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबईत निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. या आचारसंहितेमुळे मुंबई महानगरपालिका कोणतीही निविदा जारी करू शकली नाही. या कालावधीत अनेक लहान कामे प्रलंबित राहिल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मात्र 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आली. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच मुंबई महानगरपालिकेने धडाधड निविदा जारी केल्या आहेत. पालिकेच्या अनेक प्रमुख विभागांनी एकूण 290 निविदा जारी केल्या आहेत. यामध्ये पूल विभागाकडून अंधेरीतील इर्ला नाल्यावरील दोन वाहन उड्डाणपूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी (अंदाजे 31 कोटी रुपये खर्चाच्या) आणि भांडुप मधील विविध पुलांच्या संरचनेच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्चाच्या निविदांचा समावेश आहे. पर्यावरण विभागाने शहरातील विविध प्रभागांमध्ये धूळ, प्रदूषण कमी करण्यासाठी वॉटर मिस्टिंग युनिट्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत. पर्जन्य नाले विभागाने मान्सूनपूर्व गाळ काढण्याच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत. प्रभाग स्तरावर पदपथ, रस्ते आणि वाहतूक जंक्शनच्या दुरुस्तीसाठी, उद्यानाच्या सुधारणेसाठी आणि पथदिव्यांसाठीही निविदा जारी करण्यात आल्या. इतर अनेक निविदांमध्ये लहान स्थानिक कामांचा समावेश आहे. ज्यामध्ये मार्गांची सुधारणा आणि यांत्रिक व विद्युत कामांचा समावेश आहे.
गेल्या तीन वर्षापासून पालिका आयुक्त व प्रशासक यांच्या देखरेखी खाली प्रभाग आणि मुख्यालय अशा दोन्ही स्तरांवर पायाभूत सुविधांची कामे सुरू होती. असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय संस्था स्तरावरील (उदा: पर्जन्य जल नाले किंवा पूल विभाग) कामे नियोजित आणि दीर्घकालीन असतात. या निविदा म्हणजे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या समित्यांच्या तयारीचे सूचक अथवा लगेच काम सुरू करण्याचे साधन नसून येत्या काही आठवड्यांमध्ये पालिकेतील विविध वैद्यकीय समित्यांची (उदा: स्थायी समिती, आरोग्य समिती) स्थापना केली जाईल. अशी मखलाशी पालिका अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
मात्र एका प्रभाग अधिकाऱ्याच्या मतानुसार, प्रभाग स्तरावरील सुधारणा आणि देखभालीची कामे चक्रीय असून ती वर्षभर चालतात. आचार संहिता कालावधीत निविदा काढता आल्या नाहीत. परंतु या निविदांची तयारी कार्यालयीन स्तरावर यापूर्वीच झाली होती. त्यामुळे अनेक प्रभाग जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निविदा काढण्याच्या स्थितीत होते.
=====
*मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला*
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मुंबईचा महापौर कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 11 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. 7 ते 8 फेब्रुवारी रोजी शनिवार आणि रविवार असल्यामुळे 6 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तसेच यावेळी महापूर पदाच्या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त पीठासीन अधिकारी असतील.







