📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● मुलींवर अश्लील छेडछाड ते शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न; मुंबईत कायद्याचा धाक संपला!
● एक XXX का कितना लेती है! तेरा रेट क्या है
● बोरीवलीतील घटना। नगरसेवक शिवा शेट्टी पुढे सरसावले; छेडछाडीच्या घटनेत तात्काळ हस्तक्षेप करत तरुणाला पकडले
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बोरीवलीतील वजिरानाका येथे आनंदराव शाळेसमोरील परिसरात काल रात्री घडलेल्या घटनेने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रात्री वॉकिंगसाठी निघालेल्या तीन तरुणींना एका मद्यधुंद तरुणाने पाठलाग करत अश्लील भाषेत छेडछाड केली. “एक शॉट का कितना लेती है?” यासारख्या घाणेरड्या शब्दांत केलेली ही विचारणा केवळ अश्लील नव्हे, तर महिलांच्या सन्मानावर थेट हल्ला होती.
तरुणींच्या तीव्र विरोधानंतरही संबंधित तरुण अधिकच उद्धट बनला. झटापटीदरम्यान त्याने एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप असून, यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्या तरुणीच्या किंचाळ्यांमुळे जवळच असलेले गोराई वॉर्ड क्रमांक 9 मधील भाजप नगरसेवक शिवानंद (शिवा) शेट्टी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता नगरसेवकांनी त्या तरुणाला रोखले आणि संपूर्ण प्रकार व्हिडीओ कॉलद्वारे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना दाखवण्यात आला. दरम्यान, परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मद्यप्राशन केलेल्या त्या तरुणाचा माज कमी होत नसल्याने संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला.
यानंतर आमदार संजय उपाध्याय यांनी थेट हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच दोन पोलीस वाहनांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार उपाध्याय यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास कठोर कारवाई होईल.”
====
पोलीस प्रशासनासाठी इशारा?
या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न समोर आणला आहे जर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना रस्त्यावर उतरून हस्तक्षेप करावा लागत असेल, तर पोलीस यंत्रणेचा दरारा नेमका कुठे आहे? रात्री सार्वजनिक ठिकाणी महिलांवर छेडछाड होणे, मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करणे आणि पोलिस येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाणे, हे पोलीस गस्त, प्रतिबंधक उपाययोजना आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे करते. मुंबईसारख्या महानगरात जर महिलांना चालताना सुरक्षित वाटत नसेल, तर “महिला सुरक्षा” ही केवळ घोषणाच उरते. या घटनेनंतर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर अशा प्रवृत्ती अधिकच बळावतील, हे नाकारता येणार नाही.
====
आनंदराव पवार शाळेजवळ तीन मुली पायी चालत जात असताना एका मुलाने त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे लक्षात येताच त्या मुली तिथेच थांबल्या. त्यानंतर तो मुलगा त्यांच्याजवळ जाऊन अयोग्य भाषेत विचारू लागला ‘काय घेणार? किती रेट आहे?’ तसेच त्याने एका मुलीवर हातही टाकला. ही घटना पाहून मी तिथेच थांबलो व त्या मुलाला पकडले. त्याला जाब विचारला असता त्याने उलट उद्धट उत्तर देत ‘रेट विचारला तर काय झालं?’ असे सांगितले. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली व मी त्याला तिथेच चोप दिला आणि त्याला रोखले. त्यानंतर मी आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडीओ कॉलवर ही संपूर्ण घटना तात्काळ कळवली. त्यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे बोरीवली पोलिसांचे डीसीपी साहेब दोन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्या मुलाला ताब्यात घेतले. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी चालेल, पण महिलांवर होणारा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही.
-शिवानंद शेट्टी, नगरसेवक, वॉर्ड क्रमांक 9








