📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● वसई-विरारमध्ये स्वच्छतेचे धिंदवडे
● स्वच्छतेच्या 366 कोटींची रक्कम पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात?
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
वसई-विरार महानगर पालिका हद्दीत प्रमुख समस्या ही स्वच्छतेची असून पालिकेचा असा एकही कोपरा नसेल जिथे कचऱ्याचे ढिगारे अथवा अस्वच्छता आढळणार नाही. त्यामुळे दरवर्षी 366 कोटी 6 लाख रुपयांची स्वच्छतेच्या बजेटची रक्कम जाते तरी कुठे? असा सवाल वसई-विरार मधील नागरिक विचारत असून पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता घोटाळा तर केला जात नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 30 लाखांची लोकसंख्या आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या कारभारामुळे वसई-विरार महापालिका सतत चर्चेत असते. सुमारे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या 55 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणानंतरही पालिकेच्या ढिसाळ कारभारावर तसूभरही परिणाम झालेला दिसत नाही. येथील नागरिक मूलभूत सुविधांसाठी गेले कित्येक वर्षे संघर्ष करत आहेत. मात्र असे वाटते की या मूलभूत सुविधाही लोकांच्या नशिबात नाही.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि जागोजाग पाणी तुंबल्यांमुळे येथील नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. वसई-विरार पालिकेतील स्वच्छता विभागाचा निष्काळजीपणा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे शहरात जागोजाग घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. पालिकेचे सफाई कर्मचारी अनेक झोपडपट्ट्या आणि सोसाट्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे दररोज निघणारा कचरा लोकांना नाईलाजास्तव आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर तसेच रस्त्यावर कडेला फेकावा लागतो. हा कचराही पालिकेकडून नियमितपणे उचलला जात नाही. कालांतराने हा कचरा कुजायला लागतो. या कचऱ्याची दुर्गंधी सभोवतालच्या परिसरात पसरते. त्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळून जाताना नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून चालावे लागते. या कचऱ्यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. नुकतीच डेंगूमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र पालिकेच्या संवेदनाहीन अधिकाऱ्यांवर याचा काहीच फरक पडलेला नाही.
====
366 कोटींचे स्वच्छतेचे बजेट
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे स्वच्छतेचे बजेट 366 कोटी आणि 6 लाख रुपयांचे आहे. दरवर्षी पालिकेच्या अर्थसंकल्पात 366 कोटी रुपयांची तरतूद केवळ स्वच्छतेसाठी केली जाते. पालिकेच्या कार्यक्षेत्रातील विभागांची साफसफाई, गटारे, नाल्यांची सफाई, सी एण्ड डी वेस्ट, बायोगॅस प्रकल्प, मटेरियल रिकव्हर फॅसिलिटी यांचा समावेश या बजेटमध्ये आहे. मात्र स्वच्छतेसाठी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करूनही शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. गल्लीबोळापासून ते मुख्य रस्त्यावरील कचरा दोन-तीन दिवस पालिकेकडून उचलला जात नाही.
पालिकेकडून नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे तो सडून दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांना असह्य होतोच शिवाय परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठीही घातक ठरतो. केवळ मानवच नव्हे तर या कचऱ्यामुळे जनावरे आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. येथील नागरिकांचा आरोप आहे की, नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी, उमेदवारांनी मोठमोठ्या घोषणा करताना शहराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे वचन दिले होते. मात्र ही वचने आणि स्वच्छतेचे दावे केवळ कागदांवरच अस्तित्वात आहेत. वसई पूर्व येथील भोयदापाडा परिसरातील डम्पिंग ग्राउंडची प्रक्रिया गेली अनेक वर्षे त्रिशंकू अवस्थेत आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना धूर, घाण आणि दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. बजेट मध्ये 366 कोटी रुपयांची तरतूद असतानाही शहरात घाणीचे साम्राज्य कसे पसरते? हा येथील नागरिकांचा मर्मभेदी सवाल आहे. स्वच्छतेच्या बजेटची रक्कम कुठे जाते? असा प्रश्न उपस्थित करतानाच पालिकेतील अधिकारी बजेटची रक्कम स्वतःच लाटत असावेत!, असा संशयही येथील नागरिक व्यक्त करत आहेत.








