📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ २०,००० पैकी फक्त १०,००० झाडे जिवंत असल्याचे सर्वेक्षण
◆ मेट्रोने वृक्षारोपण केलेली आरेतील २८४ झाडे धोक्यात
◆ नैसर्गिक ओढा बंद झाल्याने झाडांच्या अस्तित्वावर धोका निर्माण
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई मेट्रो 3 च्या कारशेड डेपोसाठी झालेल्या वृक्ष कत्तलीनंतर भरपाई म्हणून प्रशासनातर्फे डेपोजवळील वृक्षारोपण करण्यात आलेल्यांमध्ये सुमारे 284 पूर्ण वाढ झालेल्या झाडांचे अस्तित्व जवळच्या ओढ्यातील पाणी अडवण्यात आल्यामुळे धोक्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. ओढ्यातील पाणी अडवण्यात आल्यामुळे वृक्षारोपण क्षेत्राभोवती बरेचसे पाणी साचले असून त्यामुळे झाडांची मुळे कुजून ती उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मेट्रो 3 च्या कारशेड डेपोसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे 10 वर्षापूर्वी सरकार- प्रशासनातर्फे गोरेगाव पूर्व येथील आरे कारशेडजवळ वृक्षारोपण करण्यात आले होते. आरे मेट्रो प्रकल्पासाठी तोडलेल्या वृक्षांच्या भरपाईसाठी हे वृक्षारोपण झाले होते. मात्र या भरपाई वनीकरण मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर अलीकडेच टीका करत झाडांच्या जगण्याच्या कमी दराबद्दल टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्यानुसार वनीकरण करण्यात आलेल्या 20 हजाराहून अधिक रोपांपैकी केवळ 50 टक्के म्हणजेच 10 हजारांच्या आसपास झाडे जगल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते.
मात्र ही झाडे का जगत नाही याचा धांडोळा प्रशासनाने घेण्याऐवजी पर्यावरण प्रेमींनी घेतला. त्यावेळी एक धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. मेट्रो कारशेड एक्झिटसमोर मुंबई मेट्रो प्रधिकरणाने (एमएमआरसीएल.) बिरसा मुंडा चौकाजवळ वृक्षरोपण करण्यात आलेली सुमारे 284 झाडे व्यवस्थितरित्या वाढली आहेत. या वनरोपण क्षेत्राजवळ एक नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्यातून डोंगराळ भागातील पाणी मिठी नदीत वाहायचे. आता हा ओढा बंद झाला आहे. त्याचा फटका सभोवतालच्या वनक्षेत्रातील या 284 झाडांना बसत आहे. ओढा बंद झाल्यामुळे या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे 284 झाडांची मुळे कुसू लागतील आणि कालांतराने ती मरतील अथवा उन्मळून पडतील, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे झाडां भोवती साचलेले पाणी काढून टाकावे आणि नैसर्गिक पाण्याचा मार्ग पुनर्संचयित करण्यात यावा, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे.
—-
सर्वोच्च न्यायालयातील अहवाल
गोरेगावच्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप करत पर्यावरण प्रेमींनी मोर्चाही काढला होता. याची दखल घेत न्यायालयाने या वृक्षतोडीची भरपाई करण्यासाठी वृक्षरोपण करण्याचे आदेश मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल.) अर्थात मेट्रो प्रधिकरणाला दिले होते.
या आदेशानुसार, प्रधिकरणाने 20 हजार झाडांचे वृक्षरोपण केले. 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सुमारे 20 हजार वृक्षारोपणा बाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (आयआयटीबी.) सर्वेक्षण करून सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या जुलै 2023 च्या अहवालात मेट्रोच्या कारडेपो जवळील भरपाई वनीकरणाच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.
या अहवालात नमूद केले आहे की, या उपक्रमाचा भाग म्हणून अरे कारडेपोजवळ लावण्यात आलेली 284 झाडे ‘निरोगी आणि समाधानकारकपणे वाढत आहेत’ या वृक्षांमध्ये महोगनी, कदंब, सप्तपर्णी आणि जांभूळ यासारख्या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. मात्र काही दिवसांपूर्वी नैसर्गिक ओढ्याच्या प्रवाहात अडथळा आणला गेल्यामुळे या 284 झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.








