वसईः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका पाठोपाठ एक अशा अपघाताच्या घटना समोर येत आहे.
रविवारी सकाळी पेल्हार येथे साडे नऊच्या सुमारास भरधाव ट्रकची रिक्षाला धडक लागून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या पिता पुत्राचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. आठवडा भरातील ही दुसरी अपघाताची घटना आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांपासून या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. या वाढत्या वर्दळीमुळे सातत्याने अपघाताच्या घटना ही समोर येत आहेत. रविवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास पेल्हार पेट्रोल पंप जवळ गुजरात वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षापूर्णपणे दबली गेली असून त्यात बसलेले
पिता पुत्र गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शेहजाद गुलाम उस्मानी (५२) आणि अतिफ शेहजाद उस्मानी (२२) अशी मृत्यू झालेल्या पिता पुत्रांची नाव आहेत. दोघेही पेल्हार गावात राहत होते. कामानिमित्त ते स्वतःची रिक्षा घेऊन मुंबई निघाले होते. अवघ्या काही अंतरावर पोहचताच त्यांचा अपघात घडला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी सांगितले आहे. चालकाला ताब्यात त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोघांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आठवडा भरातील हा दुसरा भीषण अपघात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.








