📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ वसई–विरार रेल्वे प्रवाशांना अद्याप दिलासा नाहीच!
◆ ५वी-६वी लाईन प्रकल्प दोन वर्षानंतरही फक्त १८ टक्के पुर्ण!
◆ २१८४ कोटींचा प्रकल्प कासवगतीने!
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील गर्दीने त्रस्त असलेल्या वसई-विरार प्रवाशांना दिलासा देणारा म्हणून जाहीर झालेला बोरीवली-विरार 5वी व 6वी रेल्वे लाईन प्रकल्प अद्याप रुळावर चढलेलाच नाही. तब्बल दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाची केवळ 18 टक्केच प्रगती झाली असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरव्हीसी) तर्फे देण्यात आली आहे.
हा 2184 कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई उपनगरीय वाहतूक प्रकल्प (चणढझड्ढ खखख अ) अंतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे बोरीवली ते विरारदरम्यान 26 किलोमीटर लांबीचे स्वतंत्र रुळ तयार करण्यात येणार असून, उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे करण्यात येणार आहेत. या कामामुळे दररोजच्या 35 लाखांहून अधिक प्रवाशांना गर्दी आणि उशिरांपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पाची गती कासवाच्या पावलांनीच सुरू आहे.
एमआरव्हीसीच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 1.81 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 1.4 हेक्टर जमीनच अधिग्रहित करण्यात आली आहे. उर्वरित जमीन न्यायालयीन वादात अडकली आहे. याशिवाय 13.62 हेक्टर मिठागर क्षेत्राचे अधिग्रहण आणि पर्यावरणीय परवानग्या अजूनही प्रलंबित आहेत.
पर्यावरण मंत्रालयाने टप्पा 1 व 2 या दोन्ही मंजुऱ्या दिल्या असून, मँग्रोव्ह क्षेत्रातील कामाला उच्च न्यायालयाच्या अटींनुसार मर्यादित परवानगी मिळाली आहे. या ठिकाणी ‘भरपाई लागवड’ आणि सतत पर्यवेक्षणाची अट घालण्यात आली आहे.
सध्या दहिसर, नायगाव आणि नालासोपारा स्थानकांवर पादचारी पूल व प्लॅटफॉर्म विस्ताराची कामे दिसत आहेत. दोन मोठ्या पुलांच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, दहिसर ते नालासोपारा दरम्यानच्या भूमी समतलीकरणाच्या निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत.
“एका मोठ्या पुलाच्या कामावर स्थगिती होती, जी नुकतीच उठवण्यात आली आहे. प्रगती आव्हानात्मक असली तरी प्रयत्न सुरू आहेत,” अशी प्रतिक्रिया एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वसई-विरार विभाग हा मुंबईतील सर्वाधिक प्रवासी दाब असलेला मार्ग मानला जातो. प्रत्येक गाडीत क्षमता ओलांडून दुप्पट प्रवासी प्रवास करत आहेत. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीत डब्यात शिरणेही अशक्य होते. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रवाशांसाठी अत्यावश्यक मानली जाते.
रेल्वे अभ्यासकांच्या मते, “हा प्रकल्प केवळ ट्रॅक वाढवण्यापुरता नसून वसईविरारच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी निगडीत आहे. वाहतुकीचा दाब कमी झाल्यास प्रवाशांच्या जीवनमानात थेट सुधारणा होईल.”
एमआरव्हीसीचे अधिकारी सांगतात, “मोठे अडथळे दूर करण्यात आले आहेत, मात्र पुढील 12 महिने प्रकल्पाच्या गतीसाठी निर्णायक ठरणार आहेत.”
वसइर्-विरार परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रेल्वे प्रवासच इथल्या नागरिकांची जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र, या जीवनवाहिनीवरचा दबाव कमी करण्यासाठीच्या या प्रकल्पाला लागलेला ‘कासवगतीचा वेग’ प्रवाशांसाठी नव्या प्रतीक्षेचा काळ निर्माण करतोय.








