देवांक दलालच्या प्रभावी खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्स संघाने प्रो-कबड्डी लीग (पीकेएल) सामन्यात पाटणा पायरेटस् संघाचा ४८-४२ असा पराभव केला. देवांकने धारदार चढाया आणि वेळेवर मिळवलेले बोनस गुण याच्या बळावर २२ गुणांची कमाई केली. यासह त्याने सलग आठवेळा ‘सुपर १०’ पूर्ण करण्याचा विक्रमही नोंदवला.
बंगाल वॉरियर्सने देवांकच्या चढाईने सामन्याची चमकदार सुरुवात केली. मात्र, पाटणा पायरेटस्कडून मनिंदर सिंगने लगेचच प्रत्युत्तर दिले. दोन्ही संघांमध्ये गुणांची देवाणघेवाण सुरू असतानाच मनिंदरच्या एका अव्वल आक्रमणामुळे सामन्याचे चित्र बदलले आणि पाटणाने ७-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पाटणाच्या बचाव फळीने आपला दम दाखवला आणि अवानच्या नेतृत्वाखाली त्यांनी पहिला ऑल आऊट करत १३-७अशी मोठी आघाडी घेतली. मध्यंतराच्या वेळेपर्यंत पायरेटस्ने ही आघाडी १६-११ पर्यंत वाढवली होती.
पाटणा संघ वर्चस्व गाजवत असतानाच, देवांकने सामना फिरवला. त्याच्या अप्रतिम ‘सुपर रेड’ने १६-१४ अशी गुणांची तफावत तर कमी केलीच, शिवाय, त्याने आपला ‘सुपर १०’चा टप्पाही गाठला. हिमांशु नरवालने आणखी एक चढाई गुण मिळवला आणि वॉरियर्सने याचा फायदा घेत पाटणावर ‘ऑल आऊट’ मिळवत १९-१९ अशी बरोबरी साधली. मध्यंतरावेळी वॉरियर्सने २५-२६ अशी माफक आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वॉरियर्सने आपली लय कायम ठेवत आघाडी वाढवली; परंतु अयानने पायरेटस्कडून जोरदार मुसंडी मारली. एका पकडीने गुणसंख्या २७-२७ अशी समान झाली आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अयानने आपला ‘सुपर १०° पूर्ण करत पाटणाचे आव्हान कायम ठेवले.
सामन्याच्या अंतिम मिनिटात हिमांशु नरवालने एक महत्त्वपूर्ण चढाई केली. त्याच्या या प्रयत्नामुळे केवळ गुणच मिळाले नाहीत, तर त्याने पाटणावर ‘ऑल आऊट’ मिळवत वॉरियर्सला निर्णायक चार गुणांची आघाडी मिळवून दिली. यानंतर वॉरियर्सने सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखत विजय निश्चित केला.







