📰 DAILY MUMBAI MITRA EXCLUSIVE
———
● सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
● मुख्यमंत्र्यांचे ‘छावा’ ला आश्वासन । शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाला ७०० कोटी रुपयांचा निधी
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी आण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथीला 700 कोटी रुपयांचा भरघोस निधी, सामाजिक बांधिलकीसाठी स्व. अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळाची स्थापना सर्व मंत्री आणि आमदारांसाठी मार्गदर्शन शिबिर आदी राज्यातील सर्वसामाजिक संघटनांच्या ‘वज्रमूठ’ या व्यासपीठाच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केल्या. ‘वज्रमूठ’ शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात घेतलेला या भेटीच्या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार नेते अभिजीत राणे, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दडपणासाठी या कार्यकर्त्यांना मारझोड पासून ते त्यांचा जीव घेण्यापर्यंतची प्रकरणे राज्यात घडत असून, त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी जनतेमधील वाढता असंतोष लक्षात घेऊन कामगार नेते अभिजीत राणे यांनी राज्यातील प्रमुख सामाजिक संघटनांना पाठिंबा दिला होता. या नव्या ‘वज्रमूठ’च्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन 10 प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव मांडला. वज्रमुठ शिष्टमंडळासह झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘वज्रमुठ’च्या 10 प्रमुख मागण्यांपैकी पाच प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केल्या. त्यापैकी कठोर कारवाई , सामाजिक कार्यकर्त्यांवरील अन्याय, अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जावी. या ‘वज्रमूठ’च्या मागणीवर ठोस आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. त्यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल. अशी घोषणा केली. तसेच पुढील दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवले जाईल. अशी पुस्तीही मुख्यमंत्र्यांनी जोडली. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी या शिक्षण संस्थेला आर्थिक निधी देण्यात यावा, या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी 700 कोटी रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेला भरघोस निधी राज्य सरकारकडून तात्काळ वर्ग करण्यात आल्याचे जाहीर केले.
सामाजिक बांधिलकी जपण्याबाबतच्या मागणी बद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या महामंडळाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन शिबिरा बाबतची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टीने स्वीकारली. सर्व मंत्री आणि आमदारांसाठी लवकरच दोन दिवसांचे, जनसेवा व लोकसंपर्क मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही बैठक संघर्ष नव्हे तर संवादासाठी होती. आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यावेळी ‘वज्रमूठ’ व्यासपीठ सरकारला आगामी काळात जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत राहील असे सांगतानाच सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर, घटनात्मक चौकटीत आंदोलक स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येईल, याच्या पुनरुच्चारही ‘वज्रमुठ’तर्फे करण्यात आला.
राज्यातील सर्व प्रमुख सामाजिक संघटनांच्या ‘वज्रमूठ’ या व्यासपीठाच्या शिष्टमंडळात ‘छावा क्रांतिवीर सेने’चे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, स्वाभिमानी ‘संभाजी ब्रिगेड’चे माधव देवसरकर, ‘छावा मराठा संघटने’चे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, ‘छावा क्रांतिवीर सेने’ चे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके, चंद्रशेखर विशे, सदा पुयड, सुनील कदम, अविनाश कदम, अमोल शिंदे, भारत पिंगळे, संकेत पिंगळे, दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे, दिलीप गवळी, मनीष तिवडे, योगेश पाटील, राजेश चव्हाण, विशाल दवणे, उत्तम बिराजदार, मनोज पाटील, मच्छिंद्र चिंचोले, राधेश्याम पवळ, साई पाटील, शंकर जाधव व इतरांचा समावेश होता.






