📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——
● 11 झाडे तोडण्याची दिली सर्शत परवानगी
● गोरेगावमध्ये पालिकेकडूनच पर्यावरणावर नरसंहार!
====
● मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभागातर्फे परवानसाठी घालण्यात आलेल्या अटी
● 11 झाडे तोडण्याची परवानगी (झाड क्रमांक 4, 6 ते 15)
● 2 झाडांचे पुनारोपण करण्याची परवानगी (झाड क्रमांक 3, 5)
● 2 झाडे जागेवरच राखून ठेवण्याचे निर्देश (झाड क्रमांक 1, 2)
● कलम 8(5)(a) अन्वये 198 झाडे नमूद स्थळी 15 दिवसांच्या आत लावावीत
● झाडांचे पुनारोपण करतानाचे फोटो व सी.डी. सादर करावी
—-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगाव (पश्चिम) येथील रामनगरमध्ये एका विकासकाकडून इमारत प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या शेकडो वर्षापूर्वींच्या झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याच्या आशयाचे वृत्त ‘दै. मुंबई मित्र’ ने प्रकाशित करून याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीवर मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभागातर्फे देण्यात आलेल्या उत्तरामध्ये विकासकाला झाडे तोडण्यासाठी प्रधिकरणामार्फत परवानगी देण्यात आल्याची कबुली दिली आहे. या कबुलीवरून पालिकेला पर्यावरणाशी काही देणे-घेणे उरले नसल्याचे स्पष्ट होते. पर्यावरणाविषयी पालिकेची चिंता म्हणजे मगरीचे अश्रू असून गेल्या वर्षी 10 हजार 224 कोटी रुपयांचा पर्यावरण प्रकल्प जाहीर करून, असा प्रकल्प बनवणारी जगातील चौथी महापालिका असल्याचा दावा करणाऱ्या पालिकेने वर्षभरात केवळ 10 टक्केच रक्कम रक्कम खर्च करून जगभरात स्वतःचेच हसे करून घेतले आहे. यातही वृत्त प्रसिद्ध करून ‘दै. मुंबई मित्र’ ने पालिकेचे पर्यावरणाविषयी असलेले पूतना मावशीचे प्रेम उघड केले आहे. त्यामुळे गोरेगावच्या विकासकाला झाडे तोडण्याची परवानगी कोणत्या आधारे देण्यात आली, याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अभिजीत राणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
‘गोरेगावच्या रामनगरमध्ये विकासकांकडून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल’या शीर्षकाखाली 1 एप्रिल 2025 रोजीच्या अंकात ‘दै. मुंबई मित्र’ ने वृत प्रसिद्ध केले होते. रामनगरमध्ये खाजगी विकासकाकडून सुरू असलेल्या इमारत प्रकल्पासाठी विकासकाकडून झाडांची बेसुमार कत्तल केली जात असून, शेकडो वर्षे जुन्या या झाडांचे ओंडके रोज ट्रकमध्ये नेले जात असल्याचे या वृत्तात म्हटले होते. याप्रकरणी दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी ‘दै. मुंबई मित्र’ तर्फे लेखी तक्रार करण्यात आली होती. यावर 2 जून 2025 रोजी मुंबई महापालिकेच्या पी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे लेखी उत्तर (स. आ. पी. द./1173/एस. आर./उद्यान दि. 30/5/25) देण्यात आले. या पत्रात पालिकेने म्हटले आहे की सदर पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, इमारत विकासकामात अडथळा ठरणारी झाडे काढण्याकरिता वृक्ष प्राधिकरणामार्फत क्र. डी. वाय. एस. जी./झेड. आय. व्ही./108/पी डेट 27/03/2025 परवानगी देण्यात आलेली आहे. या पत्रासोबत झाडे तोडण्यासाठी परवानगीची प्रतही जोडण्यात आली आहे. यानुसार 11 झाडे तोडण्याची परवानगी (झाड क्र. 4,6 ते 15) देण्यात आली, दोन झाडांचे पुन:र्रोपण करण्याची परवानगी (झाड क्र. 3,5) करावी, व त्याच्या खात्रीसाठी छायाचित्र व सीडी सादर करावी, झाड क्र. 1 व 2 ही दोन झाडे जागेवरच राखून ठेवण्यात यावीत, 198 झाडे नमूद स्थळी 15 दिवसांच्या आत लावावीत. व त्याचा अहवाल वृक्ष अधिकाऱ्यांना सादर करावा या अटी समाविष्ट केल्या आहेत.
ही परवानगी म्हणणे पर्यावरणाबाबत पालिकेचा दुटप्पीपणा उघड करणारा आहे. कारण सुमारे 1 वर्षापूर्वी पालिकेने 10 हजार 224 कोटी रुपयांचा पर्यावरण अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) सादर करून या अर्थसंकल्पाद्वारे मुंबईत पर्यावरण समस्या आटोक्यात आणल्या जातील, असा दावा पालिकेने अर्थसंकल्प सादर करताना केला होता. मात्र जून 2024 मध्ये सादर केलेल्या या अर्थसंकल्पापैकी केवळ 10 टक्केच रक्कम वर्षभरात पालिकेने खर्च केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पालिकेच्या फसव्या पर्यावरण धोरणाची चिरफाड करणारा वृत्तांत ‘दै. मुंबई मित्र’ च्या 7 जून रोजीच्या अंकात पालिकेची पर्यावरणाची लढाई केवळ कागदावरच या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला. यावरून सिद्ध होते की पालिकेला पर्यावरणाविषयी काही सोयरे सुतक उरलेले नाही.
—-
वृक्षतोड परवानगीची चौकशी करा: अभिजीत राणे
एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे अर्थ लाईफस्पेस यांसारख्या खाजगी विकासकाला बेसुमार वृक्षतोडीची परवानगी द्यायची, हा पालिकेचा दुटप्पीपणा आहे. या प्रकरणावरून पालिकेचे पर्यावरण प्रेम किती फसवे आहे ते स्पष्ट होते. तरी या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जातीने चौकशी करावी अशी मागणी मुंबई भाजप उपाध्यक्ष अभिजीत राणे यांनी केली आहे.
पालिकेने विकासकाला झाडे तोडण्यासाठी दिलेल्या परवानगी मध्ये काही अटी नमूद केल्या आहेत. यानुसार 11 झाडे तोडण्याची परवानगी (झाड क्र. 4,6 ते 15) देण्यात आली, दोन झाडांचे पुन:र्रोपण करण्याची परवानगी (झाड क्र. 3,5) करावी, व त्याच्या खात्रीसाठी छायाचित्र व सीडी सादर करावी, झाड क्र. 1 व 2 ही दोन झाडे जागेवरच राखून ठेवण्यात यावीत, 198 झाडे नमूद स्थळी 15 दिवसांच्या आत लावावीत. व त्याचा अहवाल वृक्ष अधिकाऱ्यांना सादर करावा या अटी समाविष्ट केल्या आहेत. या अटींची पूर्वता झाली की नाही, याबाबत पालिकेने काहीच तपासणी केली नाही अथवा याबाबतीत आम्हालाही काही कळवले नाही. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी आणि ही चौकशी पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अभिजीत राणे यांनी केली आहे.







