येरे येरे तू पावसा तुझा नाय भरवसा, जिथे हवा पडायला तिथे पडे ना फारसा…।।१।।
होतो पाऊस गायब छत्री नेताच सोबत, तिच्या विना जाता, करी भिजवून फसगत…।।२।।
येरे येरे तू पावसा आण सोबत उन्हाला, कधीमधी इंद्रधनू दावशील का आम्हाला?…।।३।।
ऐक आमचं पावसा दिवसाच लाव वर्दी, गच्च भिजे जरी कार्टी होऊ नको देऊ सर्दी…।।४।।
साचताच दारी पाणी मुलं बनवती होडी, तरंगण्या त्यांना सोडी आनंदाची घेण्या गोडी…।।५।।
येते मज्जा भिजायला डबक्यात खेळायला, छोटे मासे धरायला चिखलात मळायला…।।६।।
रोगराई वाढे जरा येतो जसा पावसाळा देवबाप्पा कृपा करा साथींवर घाला आळा ।।७।।
– विनोद तुलालवार मुलुंड (पूर्व), मुंबई.







