📰 MUMBAI MITRA वेध निवडणूकीचा!
——
● पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये?
● 30 महापालिका, 248 नगरपालिका, 147 नगर पंचायती, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांची होणार निवडणुक
—-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यांमध्ये पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणभेरी वाजू लागली असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रमांची घोषणा करू शकतो. या निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे व कोकणात मतदान होईल. मात्र या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरल्या जाणार नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगरपालिकेसह 29 महापालिका, 248 नगरपालिका, 147 नगर पंचायती, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका 3 टप्प्यात होणार असल्याचे कळते. एका निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग (वॉर्ड) रचनेचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. या प्रभाग रचनेसाठी सुमारे 70 दिवसांचा कालावधी लागेल. मात्र या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूपांसाठी राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी दिल्यानंतर अंतिम रचना अस्तित्वात येईल.
ही वॉर्ड रचना झाल्यानंतर प्रभाग आरक्षण निश्चित केले जाईल. या आरक्षणाबाबत सूचना आणि हरकती मागवल्या जातील त्यानंतर 15 ते 20 दिवसात वॉर्ड आरक्षण जाहीर केले जातील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगातर्फे वॉर्ड निहाय मतदार याद्या विभाजित केल्या जातील. त्यानंतर निवडणुकांसाठी मतदारांची तारीख जाहीर केली जाईल. 2024 साली विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यात आले होते. जर निवडणूक आयोगाने पुन्हा पुनर्निरीक्षण करायचे ठरवले तर नवीन अद्यावत मतदार याद्या बनवल्या जातील अन्यथा विधानसभेच्याच मतदार याद्या वापरल्या जातील. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अंतिम स्वरूपात पोहोचण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागू शकतात. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये निवडणुका होऊ शकतात.
—-
निवडणुका 3 टप्प्यात का?
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एका टप्प्यात सुमारे दीड लाख ई.व्ही.एम मशीनची गरज असते. मात्र निवडणूक आयोगाकडे सध्या केवळ 65 हजार ई.व्ही.एम मशीन उपलब्ध आहेत. त्यामुळे या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत आहे. शिवाय वाढलेली बूथ संख्या हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने 6 एप्रिल 2025 रोजी राज्यात स्थानिक निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर आयोगाने राज्य सरकारच्या नगर विकास आणि ग्रामीण विकास विभागांना वॉर्डांची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले. ही पुनर्रचना 40 दिवसांत पूर्ण करायला सांगितली होती. ही पुनर्रचना 2011 च्या जनगणनेनुसार केली जाणार असून काही वॉर्डांच्या सीमारेषांमध्ये बदल होऊ शकतात, असे कळते.
—-
व्ही.व्ही.पॅटनचा वापर नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार पावतीसाठी राज्य निवडणूक आयोग कधीही वोटर वेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (व्ही.व्ही.पॅट) मशीनचा वापर करत नाही. या पुढील 3 या निवडणुकींसाठी व्ही.व्ही.पॅट मशीनचा वापर केला जाणार नाही. त्याचा उपयोगच काही नाही कारण मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य वॉर्ड पद्धत लागू होणार आहे. त्यामुळे व्ही.व्ही.पॅट मशीनचा वापर करणे शक्य होणार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.







