मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या कोट्यातील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या कोट्यातली प्रत्येकी एका जागेसाठीचे उमेदवार जाहीर करणार आहेत. भाजपाने दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी या तीन जणांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.
