📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● मालवणी गेट नं. 8 मध्ये गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर…
● तक्रारी करूनही पी/उत्तर विभाग सुस्त
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
रस्त्यावरून वाहणारे घाणेरडे पाणी आणि कचरा नाकाला रुमाल लावूनही डोक्यात शिरणारी दुर्गंधी घाणीतून वाट काढून चालणारे पादचारी रस्त्यावरील चिखलामुळे वाहतुकीचा खोळंबा हे किळसवाणे आणि अंगावर शिसारी आणणारे दृश्य आहे. मालवणीतील गायकवाड नंबर 8चे! येथील नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभागाचे डोळे काही उघडत नाहीत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातील गायकवाड नगर गेट क्रमांक 8 मध्ये येथील रस्त्याच्या कडेला गटारे बांधण्याचे काम सुमारे 10 महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या गटारांना दुसऱ्या मोठ्या गटारांशी जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या अर्धवट गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. हे पाणी एवढे दुर्गंधीयुक्त असते की येथून चालणे म्हणजे मोठे दिव्य असते, नाकाला रुमाल लावून पादचाऱ्यांना वाट शोधावी लागते. दूषित पाण्याबरोबरच वाहून येणारा कचरा यामुळे येथील रस्ता चिखलयुक्त झालेला आहे. या चिखलामुळे पादचारीच नव्हे तर रस्त्यावर गाडी हाकणाऱ्यांनाही बऱ्याचदा त्रास होतो. यामुळे बऱ्याचदा येथे ट्रॅफिक जाम होणे त्याचबरोबर कचऱ्यामुळे येथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते.
10 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या गटाराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या गटाराची रुंदी अडीच फूट असून याची खोली 4 फुट खोल आहे. खरेतर या छोट्या गटाराची जोडले जाणे अनपेक्षित होते. मात्र महापालिकेने गटाराला जोडलेले नाही आणि कामही ठप्प पडलेले आहे. येथील अनेक नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभागाकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे पालिका अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. शिवाय नागरिकांच्या प्रश्नांना सरळ उत्तरही देत नाहीत, मुंबईसारख्या प्रगत शहरात अशी अवस्था म्हणजे स्वच्छ मुंबईचे मिशन बरबटून टाकत आहेत.
