📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● गोरेगाव आरेतील वीजेअभावी 12 आणि 10 च्या मुलांचे भविष्य अंधारात
● 50 ते 60 हजार लोकवस्ती; 1 हजारपैकी 200 घरांनाच वीजपुरवठा
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगाव पूर्व आरे मिल कॉलनी येथील एकता नगर युनिट नंबर 32 येथील झोपडीधारक गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राहत आहेत. परंतु त्यांना या ठिकाणी वीज जोडणी दिली गेली नसल्याने अंध:कारमय जीवन जगावे लागत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा ही प्रशासनाकडून दिल्या गेल्या नाहीत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे परंतु येथे राहत असलेल्या मुलांना अंधारातच अभ्यास करावा लागत असल्याने त्यांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे.
एकीकडे आपला देश महासत्ता बनत आहे आणि दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर गदा आणली जात आहे. गोरेगाव आरे मिल्क कॉलनी एकता नगर येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. एकता नगर आणि दूध वसाहतीमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षात रिलायन्स एनर्जी आणि अदानी एनर्जी यांच्यामार्फत जमिनीखालून इलेक्ट्रिकल केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु या झोपडीधारकांना अजूनही वीज जोडणी करून देण्यात आली नाही. मूलभूत सुविधा आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून वीज देणे आवश्यक असतानाही फक्त आरे दुग्ध वसाहत विकास कार्यालयातून एनओसी दिली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
आरे दुग्ध विकास वसाहतीत 32 युनिट आहेत. त्याचबरोबर अनेक आदिवासी पाडेही आहेत. या विभागात 50 ते 60 हजार लोकवस्ती वसलेली आहे. परंतु फक्त 1000 घरांपैकी केवळ 200 घरांनाच वीज जोडणी केली असल्याने 800 घरांना चोरीची वीज वापरावी लागत आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून या झोपडीधारकांच्या घरातील वीज तोडक कारवाई केली जाते.
सध्या बारावी आणि दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या विभागातील अनेक मुले मुली परीक्षेला बसली आहेत. परंतु लाईट अभावी त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने त्यांची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु दुसरा पर्याय नसल्याने अशाच परिस्थितीत या मुलांना अभ्यास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे प्रशासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढून वीज जोडणी करून देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
