📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
● मेट्रो स्थानकावरील शेअर ऑटो स्टँडला रिक्षाच नाही
● रिक्षाच नसल्याने प्रवाशांचे हाल
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असे ज्याचे वर्णन केले जाते आणि अल्पावधीत मुंबईकरांच्या पसंतीला उतरलेल्या मेट्रो रेल्वे लाईन्स 2ए आणि 7 च्या स्थानकाखाली प्रशासनाद्वारे शेअर ऑटो रिक्षा स्टँड बनवण्यात आले आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी रिक्षा मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. अंधेरी पश्चिम,आरे, कुरार, लोअर ओशिवरा आणि जोगेश्वरी (पूर्व) आदी मोजक्या मेट्रो स्थानकाव्यतिरिक्त 20 किमी लांबीच्या या अंधेरी(प) – दहिसर – गुंदवली मेट्रोच्या इतर स्थानकांवर मात्र रिक्षांच्या नावाने बोंब आहे.
सध्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ होत असतानाच परिवहन विभागाद्वारे ॲक्वा लाईन मेट्रो (आरे-बीकेसी मार्ग) या रूटवर 20 स्थानकांवर शेअर ऑटो स्टॅन्ड बसवण्याची योजना आखली आहे.
यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी (एमएमआरटीए)ने मेट्रोच्या 2 ए या मार्गावरील 17 मेट्रो स्थानके आणि मेट्रो 7 च्या 14 स्थानकांवर सर्वेक्षण केले आणि त्यानंतर 90 शेअर ऑटो मार्गांना मंजुरी दिली. या मेट्रोस्थानकांबाहेर ऑटो आणि टॅक्सी पार्किंग, ड्रॉप-ऑफ तसेच पिक-अप पॉईंट बनवले होते. मेट्रोच्या स्थानकांजवळ शेअर ऑटो रिक्षा स्टॅन्ड चे निळ्या रंगाचे फलक (बोर्ड) लावण्यात आले आहेत. या फलकांवर ऑटो रिक्षांची आकृती असलेले चित्र, क्यूआरकोड आणि फेअर चार्ट छापण्यात आले होते.
या योजनेअंतर्गत सुमारे 3 हजार रिक्षा मेट्रोच्या या फिडर रूट्सवर उभ्या केल्या जाव्यात, ज्याचा लाभ प्रवाशांना व्हावा अशी अपेक्षा होती. प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर 4 ते 6 रिक्षा उपलब्ध असायला पाहिजे होत्या.परंतु मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गावरील केवळ अंधेरी (प), आरे, कुरार,लोअर ओशिवरा आणि जोगेश्वरी (पूर्व) अशा काही मेट्रो स्थानकांव्यतिरिक्त इतर मेट्रो स्थानकांजवळील शेअर ऑटो रिक्षा स्टँडवर रिक्षा उभ्या नसतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
—-
मुंबईच्या रस्त्यांवर सुमारे 2 लाख 60 हजार ऑटो रिक्षा धावत असून त्यापैकी सुमारे 1 लाख रिक्षा शेअर मार्गावर चालविल्या जातात. मेट्रोच्या 7 या मार्गावर पूर्वेकडे सर्व्हिस रोडमुळे जास्त जागा उपलब्ध आहे. परंतु पश्चिमेला लिंक रोडवर अशी स्थिती नाही. या रोडवर हॉटेल, रेस्टॉरंट, कमर्शियल ऑफिस, रेसिडेन्शन सोसायटी आणि शॉपिंग मॉल जास्त असल्याने मेट्रोस्थानकाखाली कमी जागा आहे. त्यामुळे रिक्षा स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध नसते. शिवाय मेट्रो स्थानकावर चालणारे बहुतेक शेअर रिक्षांच्या मार्गावर त्यांच्या अंतिम टप्प्यावर रिक्षा स्टॅन्ड नाही. शिवाय रेल्वे स्थानकांच्या तुलनेत मेट्रो स्थानकांवर अद्याप प्रवाशांची गर्दी कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना हा त्रास होत आहे.
-अभिजीत राणे
संस्थापक महासचिव, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन
—-
मेट्रो -3वर लास्ट माईल कनेक्टिव्हिटी योजना
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सध्या मेट्रो-3 अंडरग्राउंड कॉरिडोर (आरे बीकेसी मार्ग) वर प्रवाशांसाठी शेअर ऑटो रिक्षा सर्व्हिस सुरू करण्याची योजना बनत आहे. एमएमआरसीच्या सूत्रांनुसार आरे ते बीकेसी दरम्यानच्या मेट्रो स्थानकादरम्यान 20 शेअर रिक्षा मार्ग विकसित केले जाऊ शकतात. याबाबत सध्या सर्व्हे सुरू आहे. याव्यतिरिक्त बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांच्या फुटपाथ बनवण्याचे काम सुरू आहे. हा मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचा हिस्सा असून हा मार्ग मार्च 2025 मध्ये सुरू केला जाणार आहे.
