📰 *MUMBAI MITRA EXCLUSIVE*
——-
● *ग्रँट रोड येथील पालिकेच्या शाळेतील चित्रपटाच्या शूटिंगमुळे रहिवाशी त्रस्त!*
● पालिकेची बंद पडलेली शाळा आणि मैदान वापरले जातेय शूटिंगसाठी
—
● चित्रीकरणाच्यावेळी होणारा गोंगाट आणि जनरेटरचा आवाज यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड
● जनरेटरमधून निघणाऱ्या डिझेलच्या धुरामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे विकार
● आर्थिक उत्पन्नासाठी पालिकेकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
● सेट बांधण्यासाठी आणि तोडण्यासाठी होणारे ठोकाठोकीचे आवाज कांनशिल बसविणारे
● सकाळी साडेसहा ते रात्री उशीरापर्यंत चालू असते शूटिंग; कधीकधी पहाटे 3 वाजेपर्यंत शूटिंग
● पहाटेपासून सेटवर प्रचंड मेगाफोनवरून आरडाओरड व गोंधळ सुरू
● मैदानही शुटिंगसठी पालिकेने भाड्याने दिल्याने मैदानावर लहान मुलांना मागील 10 वर्षांपासून खेळायलाही जागा नाही
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘रईस’ चित्रपटामुळे झोतात आलेल्या ग्रँट रोड येथील एका मुंबई महापालिकेच्या शाळेत भल्या पहाटे पासून रात्री उशीरपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने परिसरातील नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत. चित्रीकरणाच्यावेळी होणारा गोंगाट आणि जनरेटरचा आवाज यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होत असून जनरेटरमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या डिझेलच्या धुरामुळे येथील काही नागरिकांना श्वसनाचा विकार होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. मात्र स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी पालिका अधिकारी येथील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार ग्रँट रोड येथील पन्नालाल टेरेस हाऊसिंग जवळ मुंबई महापालिकेची एक बंद पडलेली शाळा आहे. या शाळेत आणि इमारतीला लागून असलेल्या मैदानात गेल्या दहा वर्षापासून चित्रपटाचे शूटिंग केले जात आहे. पालिकेने ही बंद पडलेली शाळा आणि मैदान चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाडे तत्वावर देण्यास दहा वर्षापूर्वी सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला मोजकीच शूटिंग व्हायची. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या रईस या चित्रपटातील काही भागाचे या शाळेत आणि मैदानात शूटिंग करण्यात आले. हा चित्रपट पडद्यावर झळकल्यानंतर येथे शूटिंग करणाऱ्यांची रीघ लागली. सध्या येथे दरमहिन्याला सुमारे तीन आठवडे येथे शूटिंग चालू असते.
या सततच्या शूटिंगमुळे येथील रहिवासी खूपच त्रस्त झाले आहेत. पन्नालाल टेरेस हाऊसिंग सोसायटीला लागूनच पालिकेची शाळा आणि मैदान असल्यामुळे त्यांना शूटिंगचा खूप त्रास होतो. त्यांच्या आरोपानुसार, बऱ्याचदा शूटिंग सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते आणि रात्री उशीरापर्यंत चालते, कधीकधी पहाटे 3 वाजेपर्यंत शूटिंग चालू असते. भल्या पहाटे दोन मोठे फोकस लाईट चालू केले जातात. सेटवर प्रचंड आरडाओरड गोंधळ सुरू असतो. काहीवेळा मेगाफोनवरून आरडाओरड सुरू असते, असा येथील रहिवाशांचा आरोप आहे.
कधी कधी रात्रीचे शूटिंग सुरू होते. हे शूटिंग सुरु होण्यापूर्वी उपकरणे लावताना आणि शूटिंग संपल्यावर उपकरणे उतरवताना खूपच आरडा ओरड केली जाते. त्यामुळे येथील रहिवाशांना पहाटेच्या वेळेची साखरझोप सोडाच रात्रीची सुखाची झोपही लागत नाही. शाळेच्या मैदानाकडे बेडरूमची खिडकी असणाऱ्यांना तर या शूटिंगचा प्रचंड त्रास होतो. शिवाय मैदानही शुटिंगसठी पालिकेने भाड्याने द्यायला सुरुवात झाल्यावर येथील मैदानावर लहान मुलांना धड खेळायलाही मिळत नाही. गेल्या 10 वर्षापासून मुले या मैदानावर खेळताना दिसत नाही. सतत सेट बांधण्यासाठी आणि तोडण्यासाठी येथे ठोकाठोकीचे आवाज कांनशिल बसविणारे असतात. या सेट्साठी लागणारे सामान उपकरणे इत्यादींसाठी अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. कधी कधी शूटिंग सतत 18 तासही चालते त्यामुळे येथील रहिवाशी वैतागले आहेत.
या शूटिंगचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे येथील रहिवाशांना गेल्या दहा वर्षात मोकळा श्वासही दुर्मिळ बाब बनली आहे. शूटिंगसाठी वापरली जाणारी जनरेटर व्हॅन सतत डिझेलच्या धुरामुळे येथील काही नागरिकांना श्वसनाचा विकार झाला आहे. सतत खोकल्याची उबळ येते.
याबाबतीत पन्नालाल टेरेस सोसायटीमधील रहिवाशांनी गेल्या वर्षभरात अनेकवेळा वेगवेगळ्या वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र पालिका शूटिंगसाठी रितसर परवानगीपत्र देत असल्याने पोलीस अधिकारी काही करू शकत नाहीत. शाळा व मैदान शूटिंगसाठी दिल्यामुळे पालिकेला उत्पन्न मिळते. अर्थात यापैकी पालिकेच्या तिजोरीत किती जाते आणि अधिकाऱ्यांच्या खिशात किती जाते, हा संशोधनाचा विषय आहे.
—-
* खरे तर कर भरणाऱ्या नागरिकांना इतर मूलभूत सुविधांबरोबरच सुखाची झोप आणि मोकळा श्वास घेणे क्रमप्राप्त आहे. मुंबईमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक करण्यास मनाई असताना शूटिंगसाठी अवजड वाहने कधीही कशी येतात? मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मैदान ही अत्यावश्यक बाब आहे. अशा मैदानांचा फिल्मसिटीप्रमाणे वापर कसा करता येईल? अगोदरच मुंबईची हवा प्रदूषित असताना डिझेलच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याची जाणीव पालिकांना नाही काय? असे प्रश्न तज्ञ विचारात आहेत.
—-
*मानव अधिकार आयोगाकडे तक्रार*
ग्रँड रोड मधील पालिकेच्या शाळेत होणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे येथील रहिवाशांना होणारा त्रास ही अत्यंत गंभीर समस्या आहे. मालिकेला या शूटिंग मुळे जरी उत्पन्न मिळत असले तरी येथील नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन होत आहे. त्यामुळे “अभिजीत राणे युथ फाऊंडेशन“ तर्फे राज्य मानव अधिकार आयोगाकडे या शूटिंग विरोधात आम्ही तक्रार केली आहे.
*-अभिजीत राणे*
अध्यक्ष, अभिजीत राणे युथ फाउंडेशन