📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● एमआयजी क्रिकेट क्लब वादाच्या भोवऱ्यात
● महिला सदस्यांचे खासगी व्हॉट्सॲप चॅट दाखवले बैठकीत
● क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांना नोटीस पाठवून आठ दिवसात स्पष्टीकरण देण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे येथील नामांकित एमआयजी क्रिकेट क्लबची यंदाची निवडणूक बरीच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. महिला क्लब सदस्याच्या एका गटाने त्यांच्या खासगी व्हॉट्सॲप ग्रुप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रोजेक्टरद्वारे प्रदर्शित करून सदस्यांसमोर उघड केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे धाव घेतल्यानंतर आयोगाने क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांना नोटीस पाठवून आठ दिवसात स्पष्टीकरण मागवल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी आपली व आपल्या पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न असून खेरवाडी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असे विधान क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.
प्राप्त माहितीनुसार, देशाच्या क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू ज्याच्या मुशीतून घडले आहेत, तो वांद्रे येथील नामांकित एमआयजी क्रिकेट क्लब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या क्लबच्या महिला सदस्यांनी औपचारिक संभाषणासाठी आणि निरूपद्रवी विनोद करण्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. पॉवर पफ गर्ल्स असे या व्हॉट्सॲप ग्रुपचे नाव आहे.
या व्हॉट्सॲप ग्रुपवर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीबद्दल चॅटद्वारे संभाषण आल्याची तक्रार क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मिहिर बापट यांच्या पत्नीने 19 डिसेंबर 2024 रोजी क्लब समितीकडे केली. या तक्रारीवरून 23 डिसेंबर 2024 रोजी व्यवस्थापकीय समिती आणि विश्वस्त मंडळाची तातडीची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत चार महिला सदस्यांच्या खाजगी व्हॉट्सॲप ग्रुपच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट प्रोजेक्टरद्वारे प्रदर्शित करण्यात आले. 6 महिला सदस्य या चॅटमध्ये अध्यक्षांच्या पत्नीबद्दल नाराजगी व्यक्त करत होत्या. बैठकीतील 14 ते 15 पुरुषांसमोर स्क्रीनवर हे खाजगी संदेश पाहणे धक्कादायक आणि अपमानजनक असून महिला सदस्यांच्या परवानगीशिवाय हे संदेश प्रसारित करण्यात आले. तसेच चॅटबद्दल चर्चा हा बैठकीचा अजेंडा नव्हता,असा आरोप करत सांस्कृतिक उपसमितीत असलेल्या महिला सदस्यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार देखील दाखल केली. या चॅट मध्ये डॉ. बापट यांच्या पत्नीबद्दल वैयक्तिक मत नोंदवल्याचे स्पष्ट केले. या महिला अध्यक्षांच्या पत्नीसह सांस्कृतिक उपसामितीमध्ये काम करत असून त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. महिला विश्वस्ताने या बैठकीच्या वैधतेवर वारंवार प्रश्नचिन्ह केल्याचे कळते. ही बैठक क्लबच्या घटनेनुसार नसल्याचे समजते.
दुसरीकडे एमआयजी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डॉ. मिहिर बापट यांच्या म्हणण्यानुसार त्यांना राज्य महिला आयोगाने कोणतीही कायदेशीर नोटीस बजावलेली नाही. तसेच खेरवाडी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याचा दावाही डॉ. बापट यांनी केला आहे. एका हितचिंतकाने आपणास पाठवलेल्या चॅट बैठकीत दाखवला असून त्या अत्यंत अपमानास्पद आणि प्रक्षोभक होत्या. आपण विश्वस्तांसह संपूर्ण समितीला कठोर प्रश्न विचारले. मात्र कोणतेही अपमानजनक शब्द वापरले नसून निवडणुकीपूर्वी अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीची बदनामी करण्यासाठी महिला विश्वस्तासह तिच्या मैत्रिणींनी पदाचा गैरवापर केल्याचा प्रत्यारोप डॉ. बापट यांनी केला आहे.
एमआयजी क्रिकेट क्लबचे सरचिटणीस श्रीकांत शेट्टी यांच्या मतानुसार 19 डिसेंबर 2024 रोजी अध्यक्षांच्या पत्नीकडून तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी कायदेशीर समिती स्थापन करण्यासाठी 7 जानेवारी 2025 रोजी तातडीची बैठक बोलावली. एका स्वतंत्र महिला वकिलासह समितीने संपूर्ण कार्यकारणीची बैठक बोलावली. परंतु अनेक सूचना देऊनही चारही तक्रारदार महिला सदस्य उपस्थित राहिले नाही. त्यामुळे क्लबची निवडणूक तोंडावर असताना हा केवळ निवडणूक स्टंट असल्याचे शेट्टी यांचे मत आहे.
