📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
● धडक कामगार युनियनच्या मुंबई सचिव रवि बनसोडेंच्या तक्रारीनंतर…
● म्हाडाचा लाचखोर अभियंता व कंत्राटदार गजाआड
● म्हाडा कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ सह म्हाडा कंत्राटदार संजय त्रिवेदी आणि रिक्षाचालक राजकुमार यादव विरोधात गुन्हा दाखल
===
या लाचखोरीच्या प्रकरणामुळे म्हाडामध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे हे सिद्ध होते. अशाच प्रकारे सिडको, एसआरए प्राधिकरण, दुग्ध व्यवसाय विभाग आदी सामान्य व्यक्तींशी निगडित असलेल्या खात्यांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार व्यापलेला असून त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात यावी अशी धडक कामगार युनियनची मागणी आहे.
-अभिजीत राणे
संस्थापक महासचिव. धडक कामगार युनियन
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
परिशिष्ट दोन मध्ये पात्रता सिद्ध झाल्यानंतरही अभय योजने अंतर्गत या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कांदिवलीतील झोपडपट्टीधारकांकडून प्रत्येकी 60 हजार याप्रमाणे सुमारे साडेसहा लाखाची लाच स्वीकारण्याचा दिनेश श्रीधर श्रेष्ठ (44) या म्हाडाच्या प्रथम श्रेणीच्या कार्यकारी अभियंत्यासह म्हाडाचा कंत्राटदार संजय मनीलाल त्रिवेदी (49) तसेच रिक्षाचालक राजकुमार हिरालाल यादव (36) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. धडक कामगार युनियनचे मुंबई सचिव रवी बनसोडे यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार रवी बनसोडे यांच्या काकांचे कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर परिसरातील कदमवाडी मिलिंद चाळ येथे झोपडे आहे. हे झोपडे काकाने रवी बनसोडे यांना बक्षीस पत्राद्वारे बहाल केले. हे झोपडे म्हाडाच्या परिशिष्ट दोन यादीत पात्र होते. अभय योजने अंतर्गत या परिशिष्ट यादीत आपल्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी रवी बनसोडे यांनी म्हाडाच्या भू- व्यवस्थापक मुंबई मंडळ (बोरिवली विभाग) या कार्यालयाकडे अर्ज केला होता. बनसोडे यांच्या बरोबरच मिलिंद चाळ व कदमवाडीतील इतर 10 झोपडीधारकांनी देखील या कार्यालयांकडे अर्ज केला होता. मात्र हे अर्ज म्हाडाकडे प्रलंबित होते.
या प्रलंबित अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी 27 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार रवी बनसोडे हे म्हाडाचे प्रथम श्रेणीचे कार्यकारी अधिकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ (44) यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी दिनेश श्रेष्ठ यांनी रवी बनसोडे यांना झोपडीधारकांचे पात्रता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे एकूण 6 लाख 60 हजार रुपयांची लाच लाच मागितली. या लाचेच्या एकूण रकमेपैकी 2 लाख रुपयांची रक्कम ॲडव्हान्स म्हणून म्हाडाचा खाजगी कंत्राटदार संजय मनीलाल त्रिवेदी (49) यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने रवी बनसोडे यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.
रवी बनसोडे यांच्या तक्रारीबाबत पडताळणी केली असता ही तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार बनसोडे यांच्याकडून अभियंता दिनेश श्रेष्ठ यांच्यावतीने म्हाडा कंत्राटदार संजय त्रिवेदी यांनी 60 हजार रुपये रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली आणि रिक्षाचालक राजकुमार यादव यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रिवेदी आणि यादव यांना अटक केली. या दोघांनीही लाच म्हाडा कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांच्या वतीने स्वीकारल्याचे कबूल केले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता दिनेश यांच्यासह म्हाडा कंत्राटदार संजय त्रिवेदी आणि रिक्षाचालक राजकुमार यादव या तिघांना अटक केली.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई गुन्हा रजिस्टर क्रमांक 06/2025, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7,7अ, 12 अन्वये सदर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष माणगावे, पोलीस निरीक्षक सुनिता दिघे यांच्या पथकाने म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने पार पाडली.
