📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
● मूक प्राण्यांच्या हत्येत वाढ : पशूप्रेमी संतप्त
● कुपर रुग्णालय, कांदिवली, अंधेरी, पवई मध्ये आजपर्यंत घडल्या घटना!
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुपर रुग्णालयातील 4 भटक्या कुत्र्यांच्या मृत्युप्रकरणी जुहू पोलिसांनी एफआयआर नोंदविला असून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी कुपर रुग्णालयातील एखादा कर्मचारी सामील असावा, असा संशय पशूप्रेद्वारे व्यक्त केला जात असून गेल्या काही दिवसांमध्ये उपनगरात मूक प्राण्यांच्या हत्येत वाढ झाली असल्याने कठोर कायदा करण्याची मागणी पशूप्रेमी संघटनांद्वारे केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कुपर रुग्णालयाच्या आवारात असलेल्या चार कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने खळबळ उडाली. हे भटके कुत्रे कुपर रुग्णालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत राहायचे. मंगळवारी हे चारही कुत्रे मृतावस्थेत आढळले. ही घटना कळताच कुपर रुग्णालयाचे डॉ. सुधीर मेढेकर यांनी तातडीने जुहू पोलिसांना कळविले. गेल्या तीन दिवसांपासून या कुत्र्यांवर विषप्रयोग होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कुत्र्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या सोशल मिडीयावर मृत कुत्र्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या प्रकरणी कुपर रुग्णालयातील एखादा कर्मचारी सामील असावा, असा संशय पशूप्रेमींद्वारे व्यक्त केला जात आहे. जुहू पोलीस कुपर रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमुळे पशूप्रेमी संघटना संतप्त झाल्या आहेत. पोलीस आणि कुपर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी या पशूप्रेमींची मागणी आहे.
यापूर्वीही कांदिवलीमध्ये पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोण्यांमध्ये भरून नाल्यात फेकल्याचे आढळले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. ताज्या घटनेत अंधेरीच्या एका हाऊसिंग सोसायटीमध्ये एका भटक्या कुत्र्यांची एअरगनने गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हा भटका कुत्रा खूप भुंकत असल्याने एका माथेफिरूने त्याला गोळी मारली होती. गेल्या वर्षी पवईतील एका मोठ्या सोसायटीच्या आवारातील कुत्र्यांची विषप्रयोग करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मूक प्राण्याच्या हत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून याप्रकरणी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पशूप्रेमी संघटना करत आहेत.
