📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
● ‘टोरेस’ वरील छाप्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर!
● मुंबईतील सर्व गुंतवणूकदार कंपन्यांची माहिती जमा करण्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आदेश
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
टोरेस घोटाळ्यामध्ये मुंबईमधल्या अनेक नागरिकांचे पैसे बुडाले आहेत. 21 दिवसांमध्ये पैसे डबल होतील, असे आमिष हेरा फेरीचित्रपटाप्रमाणे दाखवून अनेकांना गंडवण्याचे प्रकार टोरेसने केला आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे.
दादरमधील टोरेस या गुंतवणूक कंपनीने लाखो मुंबईकरांना चुना लावल्यानंतर आता मुंबईतील सर्व गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची झाडाझडती मुंबई पोलीस घेणार आहेत. मुंबई आणि परिसरातील सर्वच गुंतवणूकदार कंपन्यांची माहिती जमा करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.
काही संशयास्पद आढळल्यात अशा कंपन्यांवर त्वरित कारवाई करा, असे आदेश फणसाळकर यांनी दिल्याची माहिती आहे. टोरेस कंपनीच्या गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास योग्य दिशेने केला नाही, पोलिसांच्या या कामकाजाबाबत फणसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुमारे एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळा प्रकरणाचा भांडाफोड मुंबईतील भाजीपाला विक्रेता आणि व्यापारी प्रदीपकुमार वैश्य यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. त्यांच्या तक्रारी देऊन पोलिसांना माहिती दिली. त्यांचे टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात 14 कोटी अडकले आहेत.
टोरेस कंपनीमधील कर्मचारी पळून जाण्याच्या तयारीत असताना येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने प्रदीपकुमार यांना ही माहिती दिली. प्रदीपकुमार यांनी दादर येथील टोरेसचे कार्यालय गाठले. त्यांनी पोलिसांना फोन करुन यांची माहिती दिली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दादरच्या टोरेस कार्यालयावर छापा टाकला. त्यांना अंदाजे 3 कोटीची बक्कळ रक्कम सापडली. काही भेटवस्तू, गिफ्ट व्हाऊचरही सापडले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
