📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबची आजपासून चौकशी सुरू
◆थर्टी फर्स्ट, नवीन वर्षासाठी विशेष मोहीम
◆अन्न व औषध प्रशासनाची माहिती
◆- ‘दै.मुंबई मित्र’च्या माध्यमातून केल्या गेलेल्या
तक्रारींची प्रशासनाकडून दखल
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाचे स्वागत मुंबईकरांसह पर्यटक जल्लोषात करतात. थर्टी फर्स्ट अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लबमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. या दिवशी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये येणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. ‘दै. मुंबई मित्र’ने हॉटेल, रेस्टॉरंट व क्लबमधील पदार्थांच्या दर्जा संदर्भात अनेकवेळा अन्न व औषध प्रशासन विभागास तक्रारी केलेल्या आहेत व त्याचा पाठपुरावाही केलेला आहे. ‘दै.मुंबई मित्र’च्या माध्यमातून मुंबईतील अनेक हॉटेल संदर्भात केलेल्या तक्रारींची ही दखल असल्याचे मानले जात आहे.
25 डिसेंबरपासून ख्रिसमस सुरू होत असून 31 डिसेंबर रोजी 2024 या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर, पर्यटक रात्रभर जल्लोष करतात. 31 डिसेंबर हा दिवस 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट,
क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात. या दिवशी अन्न पदार्थांच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये यासाठी एफडीएच्या टीम मुंबईभर तपासणी करणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांनी दिली.