📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ पांडवकालीन जोगेश्वरी, अंधेरी गुंफांचे संवर्धन करा : रवींद्र वायकर
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभाअंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी भागातील पांडवकालीन जोगेश्वरी आणि अंधेरी गुंफा यांची देखभाल तसेच संवर्धन करण्याची मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडली. गुंफेच्या परिसरातील झोपडपट्टीचे पुनर्वसन करून परिसराचे सुशोभीकरणाचीही मागणी त्यांनी केली आहे.
जोगेश्वरी भागातील पांडवकालीन गुंफा पाहण्यासाठी महाराष्ट्राबरोबर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतू या दोन्ही गुंफाची देखभाल व संवर्धन करण्यात न आल्याने दोन्ही गुंफा जीर्ण अवस्थेत आहेत, असे वायकर म्हणाले. या दोन्ही गुंफाच्यावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत यात काही प्रमाणात वाढही होत आहे. या झोपड्यांचा पुनर्विकास करून चांगली पक्की घरे देणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली. या भागातील जयंत चाळ, ब्राह्मण पुष्पकर्ण चाळ आदी चाळींच्या पुनर्विकास गेलीअनेक वर्ष रखडला असून, तो मार्गी लावणेही अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी वायकर यांनी निवेदनाद्वारे केली असून हे निवेदन सभागृहात स्वीकारण्यात आले असून ते शुक्रवारी पटलावर ठेवण्यात आले.