📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ रस्त्यावर मध्यरात्री खुलेआम झिंगतात मद्यपी
◆ गोरेगावमधील विर लक्ष्मणराव राणे मार्गावर तळिरामांचा ओपन बार!
◆ मद्यपींकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
◆ पाळणाघराच्या कट्ट्यावर बसून मद्यपी रिचवतात बाटल्यांवर बाटल्या…
◆ रस्त्याचा फुटपाथ पालिकेकडून ठेलेवाल्यांना आंदण
◆ पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क व पालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची नागरीकांचा मागणी
◆ स्थानिक उच्चभ्रु नागरीकांमध्ये बेकायदेशीर बाबींमुळे भितीचे वातावरण
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगावमधील उच्चभ्रू अशा उन्नन नगर 2 येथील विर लक्ष्मणराव राणे मार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे. या रस्त्यावर रात्रीच्यावेळी बसणाऱ्या मद्यधुंदांना आवरणार कोण? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक मद्यपी सायंकाळपासुन दारू पिण्यासाठी येतात. पाण्याची बाटली, ग्लास विक्रीचे दुकान प्रत्येकच चौकात असल्याने मद्यपी याच ठिकाणी खुलेआम दारू पितात. विर लक्ष्मणराव रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढू लागले आहे दररोज मद्यपींची संख्या येथे वाढत आहे. याकडे गस्तीवर असलेले पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून डोळेझाक का केली जात आहे? असा सवाल येथील नागरीक विचारत आहेत.
याठिकणी दारू पिण्यासाठी उघड्यावर एकत्र बसलेल्या टोळक्यांमध्ये अनेकवेळा वाद होतात. रस्त्यांवर बार भरविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना दारूड्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. तसेच येथील नागरीकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाल्यास व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडूनच कुंड्याठेऊन तेथे फुटपाथ बंद करण्यात आला आहे. विर लक्ष्मणराव राणे मार्ग ह्या रस्त्यावर पाळणाघर असून पाळणाघराच्या कट्ट्यावरच मद्यपी रात्रभर बसून दारू पीत असून धिंगाणा घालत आहेत. यापरिसरातील सर्व नागरीक याबेकायदेशिर बाबींना येथील नागरीक त्रासले असून, यावर पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क व मुंबई महापालिकेने कारवाई कारवाई अशी मागणी करत आहेत.
—
◆ तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत
आपण ठिकाणाचा पत्ता पाठवा तात्काळ कारवाई केली जाईल, गोरेगाव पोलीसांकडून गस्त घातली जाते परंतू असे होत असेल तर अधिक कठोर कारवाई आदेश दिले जातील व गस्त वाढवण्यात येईल.
-ऋषिकेश पवळ,
वरिष्ठ पोलीस निरिक्षक (अति. कार्य), गोरेगाव पोलीस ठाणे
—
◆ सायंकाळी 7 नंतर ओपन बार
रोज संध्याकाळी 7 नंतर ते मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत ओपन बार थाटतात. येथे अनेकदा वादविवाद होतात. ज्यामुळे स्थानिक वातावरण अस्वस्थ होते. मद्यपींच्या दारू पिण्याच्या भानगडीमुळे इथे येणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो.
—
◆ पाळणाघराच्या कट्ट्यावर बसून रिचवल्या जातात बाटल्या
विर लक्ष्मणराव मार्ग या रस्तावर उच्चभ्रू गृह संकुले व मेथीबेन गुंडेचा नावाचे पाळणाघर आहे. अनेक मद्यपी या पाळणाघराच्या भिंतीला लागून व कट्ट्यावर बसून दारूच्या बाटल्या रिचवतात.
—
◆ महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
विर लक्ष्मणराव मार्ग हा रस्ताच मद्यपींमुळे महिलांसाठी घातक बनल्याचे चित्र असून, वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास देत अनेक मद्यपी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर दारू पितात. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. काही, दिवसांपुर्वी येथे बसलेल्या मद्यपींकडून एका महिलेची गाडी अडवण्यात आली. या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला. परंतू महिलेने सावधगिरी बाळगत तेथून कशी-बशी आपली टू व्हीलर काढण्यात यशस्वी झाली.