📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
कृतघ्न हिंदू आणि
अभागी प्रज्ञा सिंग
—-
✒️ अभिजीत राणे, समुह संपादक, दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र
—-
२९ सप्टेंबर २००८ साली मालेगाव इथे मशिदीच्या जवळ बॉम्बस्फोट होतो. त्या स्फोटात एक मोटारसायकल वापरलेली असते. ती साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावावर असते आणि जी त्यांनी दोन महिन्यांच्या पूर्वीच विकून टाकलेली असते. या स्फोटाच्या नंतर मुस्लीम समाज रस्त्यावर येतो आणि गुन्हेगारांना पकडून फाशी देण्याची मागणी करतो.
या स्फोटाच्या पूर्वी आपल्या देशात १९९२ पासून कित्येक बॉम्बस्फोट होऊन गेले होते पण कधीही मुस्लीम समाजाने ही मागणी केली नव्हती. हिंदूंनी पण मागणी केली नव्हती. पण यावेळी केली जाते यातील मर्म समजून घ्या.
१२ मार्च १९९३ साली मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले ज्यात ३०० पेक्षा अधिक माणसे मारली गेली. त्यावेळी कोणी मोर्चे काढले नव्हते उलट तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धादांत खोटे बोलत १३ वा बॉम्बस्फोट मस्जिद बंदर इथे झाला होता असे मुद्दामून सांगितले. बॉम्बस्फोट मुस्लीम अतिरेक्यांनी केले होते हे माहिती असूनही त्यांनी LTTE या तमिळ संघटनेकडे संशयाची सुई वळवली. आणि हे त्यांनी स्वतः कबूल केलेले सत्य आहे.
तेच शरद पवार मालेगाव बॉम्बस्फोट झाला की लगेच घोषणा करतात की शुक्रवारी मुसलमान मशिदीबाहेर बॉम्बस्फोट करुच्च शकत नाही. तेच शरद पवार १२ मार्च १९९३ साली सुद्धा शुक्रवार होता हे व्यवस्थित विसरतात.
२५ नोव्हेंबर २००८ साली अजमल कसाब आणि त्याचे १० सहकारी कराचीतून एका बोटीत शस्त्र घेऊन निघतात. रात्री मुक्काम बेट द्वारका इथल्या मशिदीत करतात. २६ नोव्हेंबरला संध्याकाळी ते हातात सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर मिळणारा कलावा बांधून डोक्याला लाल टिळा लावून मुंबईवर हल्ला करतात. बेछूट गोळीबार करत चारशे पेक्षा अधिक निरपराध मुंबईकरांचे जीव घेतात. जर तुकाराम ओंबळे यांनी जीवावर उदार होऊन कसाब ला जिवंत पकडले नसते तर हिंदू दहशतवाद हा सिद्धांत दृढ करायला या अतिरेक्यांनी धारण केलेला कलावा आणि टिळा कामाला येणारच होता.
या घटनेनंतर “Who killed karkare ?” हे पुस्तक S M Mushrif नावाचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लिहितात आणि ते दीड महिन्याच्या आत छापून प्रकाशित सुद्धा होते. हे मुश्रीफ महोदय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अर्थात शरद पवारांच्या पक्षातील एक मोठे नेते हसन मुश्रीफ यांचे बंधू आहेत हा योगायोग नाही. या पुस्तकात २६/११/२००८ चा मुंबई हल्ला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षडयंत्र होते याचे पुरावे दिले गेले आहेत आणि करकरे यांची हत्या हिंदू दहशतवाद्यांनी साध्वी प्रज्ञा यांना पकडल्याचा सूड म्हणून केल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संधान बांधून असा हल्ला घडवतो असा द्राविडी प्राणायाम या पुस्तकात मांडला आहे परंतु एक कल्पना करा.. जर अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर मालेगाव स्फोट आणि मुंबई हल्ला हे दोन्ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचे कृत्य आहे असे सरकारला सिद्ध करता आले असते. मग मुश्रीफ महोदयांनी पुस्तक लिहितांना करकरे यांचा जीव कोणी घेतला असे शीर्षक न देता हिंदू दहशतवाद असेच शीर्षक देऊन पुस्तक लिहिले असते.
थोडक्यात पुस्तकाचा सगळा मालमसाला तयार होता. कसाब जिवंत पकडला गेल्याने फोडणी बदलावी लागली. मालमसाला एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडे तयार होता याचा अर्थ लेखकाला या सगळ्या घटनाक्रमांची कल्पना होती का ? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.
कुठल्याही मोठ्या हल्ल्यात स्थानिक हात असतोच असतो. साध्वी प्रज्ञासिंग यांना पकडून छळणारी महाराष्ट्र ATS या हल्ल्यातील स्थानिक हस्तक हुडकून काढण्याचे नाटक करते पण त्यातील एकावर सुद्धा गुन्हा दाखल होत नाही , शिक्षा होणे तर फार लांबची गोष्ट आहे.
कोरेगाव भीमा इथे ज्यादिवशी दंगल होते त्यावेळी दंगल झाल्याझाल्या दोन तासांच्या आत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार मिडिया समोर येऊन ही दंगल हिंदुत्ववाद्यांनी केली होती असे जाहीर आरोप करतात. आणि नंतर मिलिंद तेलतुम्बडे आणि अन्य अर्बन नक्षली यात सापडतात. इतकेच नाही तर मिलिंद तेलतुम्बडे हे प्रकाश आंबेडकर यांचे जवळचे नातेवाईक आहे हे पण नंतर उघड होते.
हे मुद्दे यासाठी सांगतो आहे की आपल्या देशात हिंदू दहशतवाद नावाची अस्तित्वातच नसलेली थेअरी जन्माला घालण्यासाठी या थेअरीचे जनक कसे कष्ट करत असतात हे सामान्य नागरिकांना माहिती असावे. शरद पवारांचे गुन्हेगार आणि संशयास्पद मंडळींशी असणारे घनिष्ट संबंध, त्यांनी त्यांना कायम पाठीशी घालणे आणि तरीही आजवर त्यांच्यावर काहीही कारवाई न होणे ; हे खरोखर दुःखद आहे.
मध्यप्रदेशातील भिंड गावात साध्वी प्रज्ञासिंग यांचा जन्म झाला. वडील संघकार्यकर्ते होते. प्रज्ञासिंग या लहानपणापासून बंडखोर आणि कट्टर हिंदू. कॉलेज च्या काळात त्यांनी अभाविपमध्ये कार्य सुरु केले. राज्यसचिवपदापर्यंत झेप घेऊन त्यांनी नंतर अभाविप सोडली.
पुढे गुजरात हे कार्यक्षेत्र स्वीकारून त्यांनी काम सुरु केले. सन्यास धारण केला आणि संपूर्ण आयुष्य धर्मासाठी वाहून दिले. अश्या साध्वीला १० ऑक्टोबर ला महाराष्ट्र ATS अटक करते कायदेशीर दृष्ट्या २४ तास आधीच अटक केली आहे असे दाखवून न्यायालयात २४ ऑक्टोबरला हजर करते. मधल्या १३ दिवसात तीन तीन नार्को , ब्रेन मॅपिंग आणि पोलीग्राफ टेस्ट घेऊन त्यांच्याकडून हवे ते वदवून घेण्याचा प्रयास होतो पण त्या न केलेला गुन्हा मान्यच करत नाहीत. त्यांना पशुतुल्य मारहाण केली जाते आणि धडधाकट असणारी साध्वी न्यायालयासमोर आणताना अक्षरशः लुळीपांगळी झालेली असते.
या घटनाक्रमाचे वर्णन करताना साध्वी म्हणाल्या होत्या की ते मला मारहाण करत होते, अत्यंत घाण शिवीगाळ करत होते. माझ्या शिष्यांनाच मला मारायला भाग पाडत होते. पण हे सगळे सुरु असताना मी मात्र स्वतःला बजावत होते की तू संन्यासी आहेस तुला हे सहन करायचे आहे. तू देह नाहीस तू आत्मा आहे आणि या दैहिक अत्याचारांनी तुला फरक पडत नाही. साध्वी प्रज्ञा यांच्यावर अत्याचार करण्यात प्रामुख्याने हेमंत करकरे यांचेच नाव घेतले जाते. ते तत्कालीन ATS प्रमुख होते. कसाब च्या अत्याचारात त्यांचे प्राण गेले असले तरीही त्यांच्या या दुष्कर्मांवर पांघरूण घालणे निश्चितच चूक आहे.
२००८ साली या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांच्या मालिकेत समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट आणि इतर अनेक घटनांची मालिका जोडत हिंदू दहशतवाद ही थेअरी जगासमोर आणायचा तत्कालीन कॉंग्रेस नेतृत्वाचा प्रयास होता हा कबुलीजबाब तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकताच दिला आहे. सुशीलकुमार शिंदे , पी चिदंबरम , दिग्विजय सिंग आणि शरद पवार या चौघांनी मिळून हा सिद्धांत लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयास केला होता. अजमल कसाब जिवंत पकडला गेल्याने त्यांचे प्रयास विफल झाले. साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी अनन्वित अत्याचार सहन करूनही सत्याची कास सोडली नाही त्यामुळे न्यायालयीन पातळीवर सुद्धा हा सिद्धांत वदवून घेणे या खलनायकांना शक्य झाले नाही.
भाजपाने सत्तेत आल्यावर या सगळ्या प्रकारांची वस्तूनिष्ठ चौकशी सुरु केली आणि यामागील षडयंत्र उघड होऊ लागले. NIA ने कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरील आरोपपत्र मागे घेतले आणि सैन्याने तत्काळ कर्नल पुरोहित यांना आपल्या नित्य सेवेत रुजू करून घेतले. मधल्या संपूर्ण कालावधीत सैन्याने कर्नल पुरोहित यांच्यावर काहीही कारवाई केली नव्हती ही गोष्ट कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा या निर्दोष आहेत हे स्पष्ट करायला पुरेसे आहे.
हा खटला ज्या न्यायमूर्तींच्या समोर सुरु होता त्यांनी सुद्धा साध्वी प्रज्ञासिंग यांच्या बद्दल असणारा एकमेव पुरावा म्हणजे त्या कर्नल पुरोहित आणि अन्य आरोपी यांची भोपाळ इथे झालेली एक बैठक हाच आहे हे मान्य केले होते.
या सगळ्या यमयातना सहन करून तावून सुलाखून यातून यशस्वी रित्या साध्वी प्रज्ञा बाहेर पडल्या. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक दिग्विजय सिंग यांच्या विरुद्ध लढवून ३.६४ लाख मताधिक्याने विजय मिळवला. अर्थात जनतेला सुद्धा दिग्विजय हा खलनायक आहे आणि साध्वी प्रज्ञा निर्दोष आहे याची खात्री होती हेच उघड झाले.
पुढे भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यांना २०२४ ला तिकीट सुद्धा दिले गेले नाही. आज साध्वी प्रज्ञा सिंग दिल्लीत एका इस्पितळात आपल्यावर इलाज करून घेत एकाकी जीवन जगत आहेत.
एक संन्यासिनी जिने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्थांमध्ये कार्यरत राहून हिंदू धर्माची सेवा करण्यात व्यतीत केले. जिने अनन्वित अत्याचार सहन करूनही सत्याची साथ सोडली नाही. केवळ तिने जबानी दिली नाही म्हणून कॉंग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना दहशतवादी घोषित करता आले नाही. केवळ तिने अत्याचार सहन करूनही मान ताठ ठेवल्याने हिंदूंना दहशतवादी नावाची शिवी सहन करण्याची वेळ आली नाही. केवळ तिने आपल्या शरीराला लुळे पांगळे करणारे अत्याचार सहन केले पण सनातन धर्माला बट्टा लागू दिला नाही….
त्यांना षडयंत्रात अडकवणारे दिग्विजय सिंग उतारवयात दुसरे लग्न करून मज्जा मारत आहेत. शरद पवार अजूनही गावठी चाणक्य बनून महाराष्ट्रातील राजकारणात जातीयवाद पसरवत आहेत आणि त्याला सामान्य हिंदू बळी पडून आपापसात भांडतो आहे. सुशीलकुमार शिंदे उर्फ हसमुख निर्लज्ज कबुलीजबाब देऊन आपण काँग्रेसी हायकमांडचे पाळीव श्वान होतो हे अभिमानाने सांगत आहेत. पी चिदंबरम सदनिकेच्या गॅलरीत २०० कोटी रुपयांची कोबी पिकवून विकत आहेत…
आणि
सर्वस्वाचा होम केलेली ती संन्यासिनी आज एकाकी अवस्थेत विजनवासात आपल्या लुळ्या देहाला सावरत नोएडा इथे कैलास हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. डोक्यातून रक्तस्त्राव सुरु आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग आज एकट्या आहेत डोळ्यात पाणी आणून प्रश्न विचारत आहेत, ‘ हेचि फळ काय मम तपाला ?’
आपण हिंदू साधे कृतघ्न नाही आपण परम कृतघ्न आहोत.
—-