📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ धारावीतील अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू
◆ 60 वर्षांहून अधिक जुनी मशिद; 2 वर्षांपूर्वी पाठवण्यात आली होती नोटीस
◆ न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टचे बांधकाम हटविण्याचे आश्वासन
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात झाली असून मेहबूब-ए-सुबानिया मशिद ट्रस्टकडूनच ही मशिद हटवण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीला
महापालिकेकडून मशिद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला. या घटनेने धारावीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिद अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत सोमवारी 30 सप्टेंबर रोजी मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरूवात केली आहे.
मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मशिद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मशिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नव्हता, जेव्हा ही मशिद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस 2 मजले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला होता. मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी पालिकेचे पथक आल्यावर गोंधळ झाला. हजारोंचा जनसमुदाय जमला. मशिद पाडण्यावरून मोठा गोंधळही झाला.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही,असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
कोट
– हा न्यायालयाचा निर्णय आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री