📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ ’कोल्ड प्ले’ तिकिट बुकिंगमध्ये बुक माय शोचा ५०० कोटींचा घोटाळा?
◆ भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांची चौकशीची मागणी
——-
◆ बुक माय शो हा कोल्ड प्लेचा खास तिकीट भागीदार असूनही, एजंट आणि इतर वेबसाइटद्वारे तिकिटे उपलब्ध कशी?
◆ प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कारवाई करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांना पत्र
◆ बुक माय शो वर तिकिटांची किंमत 12,500 तर इतर वेबसाइटवर हेच तिकीट 3 लाख
◆ बुक माय शो वर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 316(5), 318 (3), 318 (4) व कलम 3 चे आर्थिक गैरव्यव्हार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बुक माय शो जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या नियमांच्या विरोधात जाऊन तरुणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत आहे. कॉन्सर्टची तिकीट विक्री सुरू होताच, बुक माय शो साइट आणि ॲप नियोजनबद्ध पद्धतीने क्रॅश होतात आणि नंतर विलंबाच्या डावपेचांनुसार, चाहत्यांना घाबरवण्यासाठी लांब डिजिटल रांगांचे नाटक रचले जाते. त्यामुळे चाहते घाबरले आहेत आणि एजंट आणि इतर वेबसाइटवरून जास्त किमतीत काळ्याबाजाराने तिकिटे खरेदी करत आहेत. तिकीटची किंमत जास्त केल्यामुळे तरुणांना त्याचे जास्तीचे पैसे मोजावी लागत आहे आणि त्यांचे कष्टाने कमावलेला पैसा लुटला जात आहे.
तरुणांशी होत असलेल्या या फसवणुकीविरोधात भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला आहे. याची माहिती देताना तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले की, कोल्ड प्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या विक्रीत मोठा घोटाळा समोर आला आहे. बुक माय शो वेबसाइटवर तिकिटांची किंमत 12,500/- रुपये आहे, परंतु इतर वेबसाइटवर हेच तिकीट 3 लाख रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना महागडी तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बुक माय शो हा कोल्ड प्लेचा खास तिकीट भागीदार असूनही, एजंट आणि इतर वेबसाइटद्वारे तिकिटे कशी उपलब्ध आहेत? हे फसवणुकीचे प्रकरण असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की, याआधीही विश्वचषकादरम्यान बुक माय शोवर अशा प्रकारचा फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता.
हा केवळ हजारो-लाखो चाहत्यांच्या भावनांशी खेळत नाही तर देशातील तरुणांचा वेळ, शक्ती आणि पैसा वाया घालवणारा आहे.या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त यांना पत्र लिहून दोषींवर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वात कठोर कारवाई.या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आतापर्यंत झालेली कोल्ड प्ले तिकिटांची विक्री रद्द करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. जेणेकरून चाहत्यांसोबतची ही फसवणूक थांबवता येईल.
‘बुक माय शो’कडून पोस्ट जारी
बुक माय शोने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे एक पोस्ट टाकली आहे ज्यामध्ये, कंपनीने चाहत्यांना कोणत्याही अनधिकृत प्लॅटफॉर्मवरून बनावट तिकिटे खरेदी करणे टाळण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या लक्षात आले आहे की, अधिकृत विक्रीच्या आधी आणि नंतर अनधिकृत प्लॅटफॉर्म कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर 2025 साठी तिकीट विक्री करत आहेत. ही तिकिटे अवैध आहेत. भारतात तिकीट स्कॅल्पींह करणे बेकायदेशीर आहे आणि कायद्याने दंडनीय आहे. तुम्ही या साइटवरून बनावट तिकिटे खरेदी करत असल्याने कृपया याला बळी पडू नका.’