📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
तुंगारेश्वर वन विभागाच्या जागेवर भुमाफियांचे अतिक्रमण
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात पालघर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, जमिनी गिळंकृत करण्यासाठी भूमाफियांनी आदिवासी नवीन शर्तीच्या जमिनींबरोबर वन जमिनींवर अतिक्रमण केल्याचे प्रकार उघड होत आहेत. कोळीगाव, गावदेवी मंदीर, चिंचोटी वसई (पू.) येथे सर्व्हे नं. 35 या वन खात्याच्या भूखंडावर भूमाफियांनी व्यापारी गाळे तसेच चाळी बांधल्या आहेत. मात्र, वन विभागाकडून कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहेत. याबाबत तुंगारेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांना तक्रार दिली गेली असतानाही अद्याप कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
सर्व्हे नं. 35 ही वनविभागाची राखिव जमिन असून, भुमाफियांकडून येथील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. भुमाफिया मुन्ना यादव याने तब्बल 50 रुमच्या चाळी तर, धर्मराज पाल याने 42 रुमच्या चाळी व गाळे बनवले असल्याचे समजते. याबाबतीत तक्रारदार यांनी 13 सप्टेंबर रोजी वनक्षेत्रपाल संदिप चौरे यांना अधिकृत तक्रार दिली असून सर्व बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई करुन संबंधित भुमाफियांवर महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 53,54,54-अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अद्याप वनविभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. नागरीकांची फसवणूक झाल्यावर वनविभाग कारवाई करणार का? असा सवा आता नागरीक विचारत आहेत. वन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनात आणूनदेखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता तुंगारेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे केव्हा कारवाईचे आदेश देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
