📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण
◆ गृहविभागाच्या आदेशानंतर आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल
◆ पोलीस दलात खळबळ; पुणे पोलिसांकडून कमालीची गुप्तता
◆ बंडगार्डन पोलीस ठाण्यात 120 इ, 166, 167, 177, 193, 201, 34, 203, 219, 220, 466, 474 कलमांतर्गत गुन्हा नोंद
◆ पुणे शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
——–
विशेष प्रतिनिधी, पुणे
जळगावमधील बीएचआर (भाईचंद हिराचंद रायसोनी) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात एकाच दिवशी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यावर 120 इ, 166, 167, 177, 193, 201, 34, 203, 219, 220, 466, 474 कलमांतर्गत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्याबाबत पुणे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असल्याचे मिळाले असून, याबाबत बोलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदवला गेल्याचे सांगण्यात आले. पोलिस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने पुणे शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) अभिनव देशमुख यांना या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी तक्रार दिली त्यावरून भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने शहर पोलिसांसह राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर याने गृहविभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन चौकशी सुरू होती. त्यानंतर गृहविभागाच्या आदेशाने गुन्हा नोंदवला गेला असल्याचे समजते. एकाचवेळी तीन गुन्हे, तसेच दोन ठिकाणी तक्रारदार उपस्थित नसतानाही घाईत आणि कोणतातरी हेतू ठेवून गुन्हे नोंदवले असे नवटक्के यांच्यावर दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
या प्रकरणात, जवळपास 1.69 लाख ठेवीदार गुंतले होते, यामध्ये तब्बल 1,200 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, 120 कोटींची
वसुली यशस्वीरीत्या करण्यात आली. यामध्ये तपासाअंती पाच आरोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. या आरोपपत्रांमध्ये फॉरेन्सिक ऑडिट आणि बँक व्यवहारांसह कागद जमा करण्यात आली आहेत.
बीएचआर प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर व पिंपरी-चिंचवडमधील आळंदी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020 मध्ये तीन गुन्हे नोंदवले होते. पुण्यातील तपास आर्थिक गु्हे शाखेकडून सुरू होता. पतसंस्थेने स्वस्तात मालमत्ता विकत घेणे, तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी जळगावमधून सुनील झंवरला अटक केली होती. तसेच, जळगावमधील मालमत्तेवर छापा टाकला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. पोलिसांच्या पथकाने जळगावत 10 ठिकाणी छापे टाकले होते.
