📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——-
◆ जयराज अर्पाटमेंटच्या ‘स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्ट’चा गौडबंगाल?
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई (प.) ओमनगर येथील जयराज अपार्टमेंटमध्ये सोसायटीचे काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सोसायटीतील रहिवाशांचे मत जाणून न घेता पुनर्विकास करण्याच्या घेतलेल्या निर्णया विरोधात तेथील रहिवाशांनी सहकारी संस्थेच्या उप निबंधक कार्यालयास अधिकृत तक्रारी दिल्या होत्या परंतू 12 दिवस होऊनही अद्याप कोणत्याप्रकारची कारवाई झाली नव्हती. ‘दै. मुंबई मित्र’च्या बातमीनंतर याबाबतची दखल घेण्यात आली असून, 26/4/2024, 1/8/2024 व 9/8/2024 या 3 तक्रार अर्जांवर ‘सर्व सभासद यांना एकत्रित सभा लावून सर्व गोष्टीबाबत कल्पना देऊन पुढील योग्य तो निर्णय घेण्यात यावा व अर्जात नमुद केलेली मुद्देबाबत उत्तर व माहिती तक्रारदार यांना द्यावी व उपनिबंधक कार्यालयास 8 दिवसाच्या आत लेखी खुलासा सादर करावा’ असे आदेश देण्यात आले आहेत.
जयराज अपार्टमेंटमध्येपुनर्विकासासाठी मुख्य असलेल्या ‘स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्ट’मध्ये गौडबंगाल असल्याचे आढळून आले आहे. याबाबतची तक्रार आज रहिवाश्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर माणिकपूर प्रभागाकडे केली आहे. 21 मार्च 2023 रोजी वसई-विरार महापालिकेने मे. स्ट्रक्ट केअर कन्सलटन्सी इंजिनिअरींग प्रा. लि. यांच्या स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्टचा संदर्भ देत जयराज अर्पाटमेंट ही इमारत ‘सी-1 म्हणजे अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे या प्रवर्गामध्ये मोडते अशी नोटीस देण्यात आली आहे. परंतू मे. स्ट्रक्ट केअर कन्सलटन्सी इंजिनिअरींग प्रा. लि.चा हाच स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्ट येत्या रविवारी सोसायटीच्या रहिवासी सुष्मिता कदम यांना देण्यात आला ज्यामध्ये जयराज अर्पाटमेंट ‘सी 2 बी’ प्रवर्गात मोडत असल्याचा उल्लेख केला आहे म्हणजेच इमारतीला मोठ्या स्ट्रक्चर दुरुस्तीची आवश्यकता असते पण ती इमारत अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य मानली जात नाही. असा त्याचा अर्थ घेतला जातो.
वसई-विरार महापालिकेला मे. स्ट्रक्ट केअर कन्सलटन्सी इंजिनिअरींग प्रा. लि.चा जो स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्ट सोसायटीने दिला त्यात बदल कोणी केले? का केले? पालिकेने स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्टची फेर तपासणी केली होती का? इमारत ‘सी-1’मध्ये दाखवुन पुनर्विकास प्र्रकल्प रेटुन नेण्याचा कोणाचा उद्देश आहे? सोसायटीच्या रहिवाश्यांची फसवणूक करण्यामागे कोणाचा काय उद्देश आहे? या सर्व गौडबंगाल मागे कोण आहे? असे अनेक सवाल आता उपस्थित होत असून, याबाबतीची लेखी तक्रार आम्ही पोलीस ठाण्यात करणार असल्याचे रहिवाश्यांनी सांगितले.
महत्त्वाचीबाब म्हणजे, मे. स्ट्रक्ट केअर कन्सलटन्सी इंजिनीअरिंग प्रा.लि.कडून करण्यात आलेला सोसायटीचा स्ट्रक्चर ऑडीट रिपोर्टही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रहिवाशांना देण्यात आला नव्हता. त्यानंतर 21 मार्च 2023 रोजी जयराज अर्पाटमेंट सी-1 अशा अतिधोकादायक सदरामध्ये असून ती राहण्यास अयोग्य असल्याची वसई-विरार महानगरपालिकेची नोटीसही सोसायटी सदस्यांनी 1 वर्ष रहिवाशांना दाखवली नाही. असे ‘दै मुंबई मित्र’शी बोलताना रहिवाश्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता यात उपनिबंधक कार्यालय, वसई-विरार शहर महापालिका व मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.