📰 MUMBAI MITRA EXPOSE
——
◆ नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू
◆ महिला अधिकारी, सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील गोरेगावमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव (पूर्व) च्या व्यवस्थापनाच्या सदस्यासह दोन व्यक्तींवर त्या परिसरात भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यापासून रोखल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
त्यामुळे उपासमार होऊन तब्बल 26 कुत्र्यांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अखेर याप्रकरणी नेस्को एक्झिबिशन सेंटरची महिला अधिकारी तसेच सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापन सदस्य असलेल्या महिलेचे मीना असून, सुरक्षा रक्षकाचे नाव मौर्य असे आहे. प्राणीप्रेमी मेहेक शर्मा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यावर अखेर पोलिसांनी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आत सोडण्याची विनंती केली असता प्राणी प्रेमींना धमकावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्राप्त माहितीनुसार, मेहेक शर्मा व त्यांचे पती गेल्या वर्षभरापासून गोरेगाव नेस्को मैदान परिसरात 30 ते 40 भटक्या कुत्र्यांना खायला देत आहेत. मात्र, गेल्या 3 ते 4 महिन्यांत या दोन्ही आरोपींनी शर्मा यांना कुत्र्यांना खायला देण्यास मज्जाव केल्याने 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही या आजारी कुत्र्यांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला रुग्णवाहिका आत नेण्याची परवानगी दिली नव्हती, असे शर्मा यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर शर्मा आणि इतरांनी नेस्को व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा आरोपींनी त्यांना पुन्हा कुत्र्यांना खाऊ घालण्यापासून रोखले. याप्रश्नी व्यवस्थापनाशी चर्चा करू, असे आश्वासन प्रतिनिधींनी दिले.