📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——
◆ ‘दै. मुंबई मित्र’चा दावा तंतोतंत खरा
◆ वसईतील ‘बसिन गेट बिअर शॉप’कडून ‘दारु बंदी कायदा’ धाब्यावर!
——
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरार परिसर दारूबंदी कायद्याची ऐशी तैशी करत बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्या बिअर शॉपी विरोधात ‘दै.मुंबई मित्र’ने रणशिंग फुंकत या बिअर शॉपीचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांचा पर्दाफाश केला. ‘दै. मुंबई मित्र’च्या 18 जुलैच्या अंकात ‘वसई-विरार बिअर शॉपींकडून दारुबंदी कायद्याचे उल्लंघन अद्यापही सुरुच!’ यामथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. ‘दै. मुंबई मित्र’च्या त्या दाव्याला आज पुष्टी मिळाली असून वसई (प.) रेल्वे स्टेशन लगत असलेल्या ‘बसिन गेट बिअर शॉप’मध्ये सर्रास ग्राहकांना तेथेच बसुन बिअर पिण्याची सोय करुन देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वसई-विरार नामधारी कारवाई होत असल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
‘दै. मुंबई मित्र’ने या विरोधात लेखी तक्रारही शासनाकडे दिल्या. मात्र गेंड्याच्या कातडीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ ‘दै.मुंबई मित्र’ने प्रसिद्ध केलेल्या बिअर शॉपींवर नाममात्र कारवाई करत कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे निर्धास्त असलेल्या या बिअर शॉपींमध्ये परिस्थिती पुन्हा मूळ पदांवर आली असून त्यांचे अनुकरण करत इतर बिअर शॉपीही आता दारूबंदी कायद्याची उघडपणे पायमल्ली करत मद्यविक्री करत आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क नक्की कोणाच्या हितासाठी कार्यरत आहे? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.