📰 MUMBAI MITRA IMPACT
——
◆महामार्गांवर पूर्णपणे होर्डिंग बंदी; लवकरच नवीन धोरण
◆ नव्या धोरणात मोठ्या फलकांबाबत नियम
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
घाटकोपर येथे महाकाय जाहिरात फलक कोसळल्यानंतर मुंबई
महापालिकेकडून नव्याने जाहिरात फलक संदर्भात धोरण बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डिजिटलसह सर्व प्रकारच्या जाहिरात फलकासाठी धोरण बनवताना त्यामध्ये काही नवीन नियमही लागू होणार आहेत. यामध्ये मुंबईतील महामार्गांवरही पूर्णपणे होर्डिंग बंदी येणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2016च्या निर्देशांची
अंमलबजावणी महापालिका करणार आहे. धोरण येण्याआधीच महापालिकेने रस्ते मंत्रालयाच्या निर्देशानुसार महामार्गांवरील 26 होर्डिंगही काढले आहेत.
घाटकोपर छेडानगर येथे 13 मे, 2024 रोजी जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली होती. लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या अनुषंगाने मध्य आणि पश्चिम रेल्वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे 40 बाय 40 फूटपेक्षा अधिक आकाराच्या जाहिरात फलकांवरून वाद सुरू झाला. त्यामुळे महापालिकेने रखडलेल्या नवीन फलक धोरणाला गती देतानाच स्वतंत्रपणे डिजिटल जाहिरात फलक धोरणही आखण्यास सुरुवात केली आहे.
न्यायालयानेही महापालिकेला नवीन धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने 2017मध्ये नवीन धोरण तयार करण्याची तयारी सुरू केली होती. धोरण राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते, राज्य सरकारने काही बदल करावयास सांगून ते पुन्हा महापालिकेकडे पाठवले. करोना काळात ही प्रक्रिया रखडली. आता सर्व प्रकारच्या फलकांसाठी धोरण तयार केले जात असून काही अटी, निर्बंध लागू केले जाणार आहेत.
सध्या मुंबईतील पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्गाबरोबरच फ्री-वेच्या दोन्ही बाजूला होर्डिंग्ज आहेत. या महामार्गांवर कोणत्याही प्रकारचे फलक लागू नये, यासाठी मुंबई महापालिका नव्या धोरणामार्फत अंमलबजावणी करणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या मुंबईतील महामार्गांवर विविध प्रकारे फलक लावण्यात येत असून ते काढण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
