📰 MUMBAI MITRA WORLI HIT & RUN
——-
◆ वरळी हिट अँड रन प्रकरण
◆ शिवसेना शिंदे गटाचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध ॲट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. ॲट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली. नवऱ्याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आले नाही. वरळी पोलिसांनी हिट ॲड रन केसमध्ये एक पांढ-या रंगाची बीएमडब्ल्यू गाडी ताब्यात घेतली आहे. ज्यावर एका पक्षाचे चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मिहीरचे वडील पालघरमधील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, प्रकरण घडले त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी पोलिसांनी मिहीर शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चौकशीसाठी राजेंद्रसिंग बिडावत आणि मिहीरचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी कलम 105, 281, 125 (1), 281, 125 (ब), (ब), 238, 324 (4) भारतीय न्याय संहिता सह कलम 184, 134 (अ), 134 (ब), 187 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
—
बारमध्ये पार्टी, तब्बल 18 हजारांचे बिल
अपघातातील आरोपी मिहीर शहा याने मुंबईतील जुहू येथील व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये आरोपीने मित्रांसोबत मद्यसेवन करत पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. या बारमध्ये त्यांचे 18,730 रुपयांचे बिल झाले होते.
—
कडक कारवाई होईल : मुख्यमंत्री
वरळी हिट अँड रनप्रकरणी कोणालाही पाठीशी घातल जाणार नाही. दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल’ असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
—
मिहीर शाहची गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात
वरळी हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर आरोपी मिहीर शाहने घटनास्थळावरून पळ काढला होता. या दरम्यान तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेल्याची देखील सुत्रांकडून माहिती मिळत आहे. गर्लफ्रेंडच्या घरी काही तास घालावल्यानंतर तो तेथून निघाला होता. यावेळी त्याने त्याचा फोन देखील स्विचऑफ केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी चौकशीसाठी मिहीरच्या गर्लफ्रेंडला ताब्यात घेतले आहे.
—
वाईस ग्लोबल बारवर कारवाईला सुरुवात
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीम बारमध्ये सध्या माहिती घेऊन कारवाई करत आहे. बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमाचे पालन केले जात होते का आणि हा बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का या संदर्भात देखील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे.
