📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ ‘दै. मुंबई मित्र’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल
◆ वसईतील 3 बिअर शॉपवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
◆ किंग्ज बिअर शॉप, श्री कृपा बिअर अँड वाईन्स, एसआरए बिअर शॉपवर वसई विभागाकडून कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दारु बंदी कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या वसईतील तीन बिअर शॉपीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल धाड टाकून कारवाई केली आहे. यामध्ये वसई पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.1 जवळील ‘किंग्ज बिअर शॉप’, कार्मल क्लासच्या खाली असलेले ‘श्री कृपा बिअर अँड वाईन्स’, दर्शनीभागात अनधिकृत शेड टाकून तयार केलेल्या ‘एसआरए बिअर शॉप’वर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’ने 27 जून रोजी ‘वसईमध्येही दारुबंदी कायद्याला हरताळ!’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. वसई-विरारमध्ये बिअर शॉपी मालकांकडून सर्रास ‘दारू बंदी’ कायद्याला तिलांजली देण्यात असल्याचे एकंदरीत चित्र आजही आहे. त्यामुळे याबाबतीत अधिक कारवाई करण्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केलेल्या कारवाईत किंग्स बिअर शॉपमध्ये हिशोब नोंद वहीत हिशोबात काही प्रमाणात नोंद आढळून आली नाही तसेच बिअर शॉपच्या बाहेर पिण्याची व्यवस्था केलेली आढळून आली. याबाबतीत शॉप मालकाच्या कामगारास विचारणा केली असता गिऱ्हाईकांना बिअर पिण्यास देत असल्याचे त्याच्याकडून मान्य करण्यात आले.
श्रीकृपा बिअर शॉपवरील धाडीत ग्राहक बिअर पिताना आढळून आला. एसआरए बिअर शॉपवरील धाडीत दुकानमालकाकडून कॅशमेमो सादर केला नाही तसेच बिअर साठ्यात तफावत आढळून आली असल्याची शासन पातळीवर नोंद करुन घेण्यात आली आहे.
‘दै. मुंबई मित्र’ने स्टिंग ऑपरेशन्स करून छायाचित्रांच्या पुराव्यासह याबाबतीत 27 जून रोजी बातमी प्रसिध्द केली होती ज्यामध्ये, दारूबंदी कायदा धाब्यावर बसवून वसई पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.1 जवळील ‘किंग्ज बिअर शॉप’मध्ये उभे राहून बिअर पिता येते, तर कार्मल क्लासच्या खाली ‘श्री कृपा बिअर अँड वाईन्स’ या दुकानात चक्क मद्यपीना बसून मद्य पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ‘एसआरए बिअर शॉप’मध्ये चक्क अनधिकृत शेड टाकून ग्लासासह बिअर प्यायला दिली जाते. अशी एकंदरीत परिस्थिती होती.
‘श्री कृपा बिअर शॉप अँड वाईन्स’मध्येतर चक्क बिअर शॉपीमधून प्रवेश केल्यावर आतमध्ये खुर्च्यांवर बसून बिअर पिणारे मद्यपी आढळले. बाहेरून थोडाही संशय न येणाऱ्या या शॉपीमध्ये आतमध्ये गेल्यावर जणू अलिबाबाच्या गुफेत आल्यासारखे वाटते. येथे तीन-चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून बिअर पिता येते. त्यामुळे मद्यपींची येथे प्रचंड गर्दी दिसून येते. बाहेरून शॉपी तर आतमध्ये ‘मिनी रेस्टोरन्ट अँड बार’उघडला होता.