📰 MUMBAI MITRA FOLLOWUP
——-
◆ वसईमध्येही दारूबंदी कायद्याला हरताळ!
◆ राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळ्यावर कातडे पांघरून गप्प
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई-विरार परिसरामध्ये विविध बिअर शॉपीकडून दारूबंदी कायद्याचे कसे तीन-तेरा वाजवले जात असताना, ‘दै. मुंबई मित्र’ने स्टिंग ऑपरेशन्स करून छायाचित्रांच्या पुराव्यासह वेळोवेळी प्रकाशित केले आहे. विरार येथील दारूबंदी कायदा धाब्यावर बसवणाऱ्या बिअर शॉपीच्या लेखी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळ्यावर कातडे पांघरून गप्प बसले आहे. विरारचे हे लोण आता वसईमध्येही पोहचले असून वसई पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.1 जवळील ‘किंग्ज बिअर शॉप’मध्ये उभे राहून बिअर पिता येते, तर कार्मल क्लासच्या खाली ‘श्री कृपा बिअर अँड वाईन्स’ या दुकानात चक्क मद्यपीना बसून मद्य पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ‘एसआरए बिअर शॉप’मध्ये चक्क अनधिकृत शेड टाकून ग्लासासह बिअर प्यायला दिली जाते. या तिन्ही बिअर शॉपचे स्टिंग ऑपरेशन ‘दै. मुंबई मित्र’ने केले असून सबळ पुराव्यानिशी प्रसिद्ध होणाऱ्या या वृत्तानंतर तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करणार आहेत की, वसईचे देखील ‘ड्रग हब’मध्ये रूपांतर होण्याची वाट पाहत आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
‘दै. मुंबई मित्र’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये वसई रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.1 च्या जवळ ‘किंग्ज बिअर सेंटर’ नावाची बिअर शॉपी आहे. कायद्यानुसार बिअर शॉपीमध्ये केवळ बिअरची व्रिक्री करता येते. दुकानात बसून अथवा उभे राहून बिअर पिता येत नाही. मात्र ‘किंग्ज बिअर सेंटर’ मध्ये हा कायदा बाजूला सारत मद्यपीना दुकानाच्या आत उभे राहून बिअर पिण्याची सवलत आहे.
वसई पश्चिम येथील कार्मल क्लासच्या खाली ‘श्री कृपा बिअर शॉप अँड वाईन्स’ नावाची बिअर शॉपी आहे. या शॉपीमध्ये जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले, तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चक्क बिअर शॉपीमधून प्रवेश केल्यावर आतमध्ये खुर्च्यांवर बसून बिअर पिणारे मद्यपी आढळले. बाहेरून ही शॉपी साधी दिसते. मात्र, आतमध्ये गेल्यावर जणू अलिबाबाच्या गुफेत आल्यासारखे वाटते. येथे तीन-चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून बिअर पिता येते. त्यामुळे मद्यपींची येथे प्रचंड गर्दी दिसून येते. बाहेरून शॉपी तर आतमध्ये ‘मिनी रेस्टोरन्ट अँड बार’ आहे. अशा या बेकायदेशीर मिनी रेस्टोरंटमुळे शासनाचा प्रचंड महसूल बुडतो.
वसई पश्चिम येथील ‘एसआरए बियर शॉप’मध्ये तर भयानक प्रकार आहे. मुळात या बियर शॉपीचे बांधकामच अनधिकृत असल्याचे स्टींग व्हिडियोमध्ये दिसते. बेकायदेशीर शेड टाकून येथे मद्यपींना कट्ट्यावर बसून बियर रिचवता येते. प्यायल्यानंतर त्यांचा धिंगाणा भर रस्त्यात सुरू असतो. त्यामुळे या शॉपी जवळून जायलाही महिला वर्ग कचरतो. शिवाय या बियर शॉपमध्ये मद्यपींना मद्य पिण्यासाठी ग्लासही दिले जातात. मुळात अनधिकृत शेड असलेल्या या बियर शॉपीचा परवाना अद्याप पालिकेने शाबूत कसा ठेवला आहे? अनधिकृत शेडवर पालिका कारवाई का करत नाही? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
पुण्यातील बहुचर्चित ड्रंक अँड ड्राइव्ह घटनेनंतर राज्यभरात मद्यविक्री संदर्भातील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. परंतु, वसई-विरार परिसरातील बिअर शॉपीद्वारे दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाशी हातमिळवणी करून निर्भय बनलेल्या बिअर शॉपीपैकी ‘दै.मुंबई मित्र’ने ‘लक्ष्मी’ बिअर शॉपीचे 22 जून रोजी तर ‘आरुष’ बिअर शॉपीचे 23 जून रोजी पुन्हा स्टिंग ऑपरेशन केले. त्याबाबतची बातमी 24 जून रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
विरारमध्ये ‘दारूबंदी कायदा कागदावर’या शीर्षकाखाली 28 मे 2024 रोजीच्या तर ‘दारूबंदी कायदा’ नावालाच…! या शीर्षकाखाली 6 जून 2024 रोजीच्या ‘दै. मुंबई मित्र’च्या अंकात वसई-विरार परिसरातील बिअर शॉपी दारूबंदी कायद्याला कसे धाब्यावर बसवतात, याचे छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले होते. यासाठी ‘दै.मुंबई मित्र’ने स्टिंग ऑपरेशनही केले होते.
याप्रकरणी ‘दै. मुंबई मित्रने लेखी तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केल्या होत्या. मात्र तरीही केवळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीबाबत येथील जनतेकडून संशय व्यक्त केला जात आहे.