📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ पुण्यात 1 कोटी 39 लाख रुपयांचा गुटखा जप्त
◆ पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
——–
विशेष प्रतिनिधी, पुणे
हजारो कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणानंतर आता पुण्यात करोडो रुपयांचा गुटखा तयार होत असल्याचे समोर आले आहे. सिंहगड रोडवरील नर्हे भागातील एका गोदामावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला आणि कारवाई करत 1 कोटी 39 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. हा “दै.मुंबई मित्र“ने गेले वर्षभर सुरू केलेल्या गुटखाविरोधी “ऑपरेशन गुटखा“ या मोहिमेचा इम्पेक्ट आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पुण्यातील सिंहगड वरील नर्हे भागात गुटख्याचे गोदाम असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड मारत 1 कोटी 39 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. त्याचप्रमाणे गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. याठिकाणी गुटखा तयार होत असल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका साथीदाराचे निधन झाले आहे.
पुष्पेंद्र अकबल सिंग (वय 27, रा. नर्हे, मूळ उत्तर प्रदेश), सुनील पठाण सिंग (वय 45, रा. नर्हे, मूळ उत्तर प्रदेश), मुकेश काळुराम गेहलोत (वय 28, रा. आंबेगाव, मूळ राजस्थान), चंदन अजयपाल सिंग (वय 32, रा. नर्हे, मूळ, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार नीलेश लालवाणी (वय 40, रा. नर्हे) हा फरार झाला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हा गुटखा सर्रास पान टपरीमध्ये वेगवेगळ्या नावाने मिळतो.
नर्हे येथील एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. या गोदामातून हा गुटखा शहरातील विविध भागातील विक्रेत्यांकडे पाठविला जात होता. शनिवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनने या ठिकाणी छापा टाकला.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
“दै.मुंबई मित्र“ने गेल्या वर्षभरापासून गुटख्याविरोधात “ऑपरेशन गुटखा “ ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत गुटखा तस्करी, गुटखा तस्करीचे मार्ग, गुटखा तस्करांचा इतिहास, गुटखा तस्करांची संपत्ती,गुटखा उत्पादनाची ठिकाणे आदी विषयी विस्तृत माहिती “दै.मुंबई मित्र“ने वेळोवेळी प्रसिद्ध केली.त्याचप्रमाणे गुटखा तस्करीच्या लेखी तक्रारी व त्यांचा पाठपुरावा केला.
