📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ लोणावळा, खंडाळ्यात 14 पान टपऱ्यांवर कारवाई
◆ 14 जणांना अटक; 1 लाख 8 हजारांचा गुटखा जप्त
——–
विशेष प्रतिनिधी, लोणावळा
लोणावळा, खंडाळ्यात गुटखा विक्री करणाऱ्या चौदा पान टपरी धारकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईत चौदा जणांना अटक केली असून एक लाख आठ हजार 772 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा आयपीएस सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग यांनी कारवाई केली.
रवी बुगडे, अतुल लोखंडे, कृष्णा संदीप गवळी, मनोजकुमार भारद्वाज, उमर मोहमंद एम.बी, यासीन मोहमंद अब्दुल रेहमान (सर्व रा. गवळीवाडा लोणावळा), मोहमंद एकलास खान (जी-वार्ड, लोणावळा), संजय कान्हु सोनवणे (भांगरवाडी, लोणावळा), अशोक पुजारी (रा. व्दारकामाई सोसायटी, लोणावळा), शकील अख्तर रईससुद्दीन शेख (हुडको कॉलनी लोणावळा), मोहमंद हसिब शरीफ मन्सुरी (इंदीरानगर, लोणावळा), अब्दुल रहिमान इब्राहिम (वलवण, लोणावळा), शोयब नईम खान (म्हाडा कॉलनी लोणावळा), वसुद्दीन सिराजउद्दीन खान (रा. नेताजीवाडी खंडाळा) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पान टपऱ्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस शिपाई गणेश येळवंडे यांनी फिर्याद दिली आहे.
‘दै.मुंबई मित्रने’ गेले वर्षभर चालू केलेल्या गुटखाविरोधी मोहिमेला राज्यभरातून पोलिसांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून पोलिसांकडून वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी गुटखा व गुटख्याचे अड्डे उध्वस्त केले जात असून,ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. त्यामुळे जनतेकडून “दै.मुंबई मित्र’च्या गुटखाविरोधी मोहिमेचे कौतुक केले जात आहे.